“छगन भुजबळांनी नवा पक्ष काढावा, आम्ही युती करु”,नेत्याचा सल्ला ;काय म्हणाले भुजबळ ?
"Chhagan Bhujbal should form a new party, we will form an alliance", the leader's advice; What did Bhujbal say?

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यामुळे छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली आहे.
त्यातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी छगन भुजबळांना एक सल्ला दिला आहे. “छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या नावाने पक्ष काढावा”, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. त्यावर आता छगन भुजबळांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
महादेव जानकरांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’सोबत संवाद साधला. यावेळी त्यांना छगन भुजबळांवर अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का,
असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. तसेच त्यांनी यावेळी बोलताना छगन भुजबळांना एक मोलाचा सल्लाही दिला.
“ओबीसींची अशीच अवस्था होणार आहे. ज्या समाजाचे दल आहे, त्या समाजाचे बळ आहे. अन्याय झाला म्हणून मी आता बोलू शकणार नाही. कारण आपला पक्ष नाही.
आपण याचिकाकर्ते आहोत. देणारे बनणारे असाल, तर आम्ही आमचं दल केलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही समता परिषदेच्या नावाने एखादा पक्ष काढा, आम्ही तुमच्याबरोबर युती करु. त्यांनी जर हा निर्णय घेतला तर चांगलं होईल.
आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिवशी त्यांनी ते करावं. त्यांनी तो निर्णय घेतला तर चांगलं होईल. आताच नाही पुढच्या पिढीचंही भलं होईल”, असे महादेव जानकर म्हणाले.
“मागितल्याने भीक मिळते, हक्क मिळत नाही त्यामुळे मागण्यापेक्षा देणार झालं पाहिजे ओबीसीबाबत भाजप आणि काँग्रेसची पण नियत चांगली नाही. राज्यात एव्हीएम सेट करण्यात आला म्हणून यांची थंपिंग मेजोरिटी आली.
आमची मतही भाजपला वळवण्यात आली आहेत. बलेट पेपरवर निवडणूक घ्या, आमच जे होईल ते होईल. ईव्हीएम लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत आहेत.
राष्ट्रीय समाज पक्ष हा दिल्ली आणि बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे. आम्ही आता एनडीएतून बाहेर आहोत”, असेही महादेव जानकरांनी म्हटले.
दरम्यान महादेव जानकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर छगन भुजबळांनीही भाष्य केले आहे. “महादेव जानकर यांच्या समता परिषदेच्या नावाने एखादा पक्ष काढा या वक्तव्यावर छगन भुजबळांनी ठीक आहे”, असे म्हटले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज एकाच वाहनातून प्रवास केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे.
त्या निमित्ताने सातारा नायगाव येथे एका कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केला.
सध्या छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये नाराज आहेत. पक्षाने त्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं. त्यांच्यावर पक्षात अन्याय होतोय म्हणून विविध ओबीसी संघटनांनी आंदोलनं केली आहेत.
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये सहभागी होणार अशा सुद्धा चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्यास भुवया उंचावणं स्वाभाविक आहे.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुर्हूतमेढ रोवली. विधवा व परित्क्या यांना त्यांनी जगण्याचा अधिकार दिला.
समाजातील कुप्रथा संपवल्या. आज त्यांना अभिवादन करण्यासाठी मी त्यांच्या मूळगावी आलो आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “मी त्यांना अभिवादन केलं.
नुकतचं त्यांचं दर्शन घेतलं. त्यांच्या स्मारकाचा एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाकडून होत आहे. त्याचं मी प्रेझेंटेशन घेतलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “लवकरात लवकर विस्तारित स्वरुपात हे स्मारक व्हावं असा आमचा प्रयत्न असेल” असं ते म्हणाले.
आज सामनातून गडचिरोलीच्या कामाच कौतुक करण्यात आलय. त्यावर देवेंद्र फडणवीस ‘चांगलं आहे, धन्यवाद’ एवढच म्हणाले. छगन भुजबळ यांच्यासोबत काय चर्चा झाली? त्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
“महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य पुढे कसं नेता येईल”, या विषयी चर्चा झाली. “त्यांनी देशाला दिशा देण्याच काम केलय.
तो विचार सर्वांपर्यंत कसा पोहोचवता येईल, समतायुक्त भारतीय संविधान मानणारा समाज कसा बनवता येईल याविषयी चर्चा झाली” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी उभे होते.