काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत
These names are being discussed for the post of Congress state president.
भाजपच्या प्रदेशाध्यपदाच्या बदलानंतर आता कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून नाना पटोले पायउतार होणार असून, नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत,
तर या पदासाठी तरुण चेहऱ्याला पक्ष संधी देणार का असेल, अशी चर्चा काँग्रेस पक्षात रंगली आहे. विश्वजीत कदम, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची नावे या पदासाठी चांगलीच चर्चेत आहेत.
लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली होती. त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आता चार वर्षे झाली आहेत.
त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठं यश मिळावलं. मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
यामुळे पटोले यांना हटवण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.
पक्षामध्ये पुन्हा उत्साह निर्माण करेल, अशा नेतृत्वाच्या शोधात काँग्रेस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण,
विजय वडेट्टीवार यासह वरिष्ठ नेत्याच्या नावांच्या चर्चा असतानाच आता पुन्हा एकदा पदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी यशोमती ठाकूर यांचं देखील नाव विदर्भातून पुढे चर्चेत येत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विदर्भात आधिक जागा जिंकल्या आहेत. लोकसभेत काँग्रेसला विदर्भामध्ये चांगलं यश मिळालं.
विदर्भातून नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं नाव विधिमंडळ गटनेतेपदासाठी चर्चेत आहे. पटोले किंवा वडेट्टीवार यांच्यापैकी कोणालाही विधिमंडळ गटनेते बनवले तर प्रदेशाध्यक्षपद मराठवाड्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जावू शकते, अशी चर्चा आहे.
अमित देशमुख यांना प्रदेशाध्यपद देण्यासाठी पटोले आग्रही आहेत. सतेज पाटील यांच्या नावाची देखील चर्चा आहे. जुलैमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुदत संपत आहे.
त्यामुळे कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद येईल. त्यासाठी देखील सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. विश्वजीत कदम यांचे नाव देखील चर्चेत आहे. पक्षातील तरुण नेते स्वतःहून हे पद घेण्यास इच्छुक नाहीत,
असंही म्हटलं जातंय. त्यामुळे पक्षातील बडे नेते किंवा तरूण नेते यांच्यापैकी कोणी स्वतःहून हे पद घेण्यास उत्सुक नसल्याचं चित्र आहे, मात्र, पक्षाने दिले तर ही जबाबदारी घ्यावी लागेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या होणाऱ्या नावांच्या चर्चेबाबत बोलताना म्हटलं, होणाऱ्या चर्चांवर माझं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाही. या महिन्यात नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल की नाही हे मला माहीत नाही, असंही ते पुढे म्हणाले आहेत.