पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बॉम्बस्फोटाच्या फोनने खळबळ
Bomb blast phone call on PM Narendra Modi's plane causes stir

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याची धमकी देण्यात आली. मोदी अमेरिकेला जात असलेल्या विमानात दहशतवादी बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी या दूरध्वनीची गंभीर दखल घेतली असून तातडीने दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याचा दूऱध्वनी मंगळवारी पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आला. मोदी अमेरिकेला जात असलेल्या विमानात दहशवादी बॉम्बस्फोट घडवणार आहेत.
मी याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. त्या दहशतवाद्याने गेल्या महिन्याभरात सहा विमान क्रॅश केले आहेत. तोच अमेरिकन दहशवादी मोदींच्या विमानात बॉम्बस्फोट घडवणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
त्या व्यक्तीचे दूरध्वनी तपासले असता त्याने आतापर्यंत १४०० हून अथिक वेळा मुंबई पोलिसांना दूऱध्वनी केल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तीबाबत माहिती घेण्यात येत आहे. दूरध्वनी करणाऱ्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
गेल्यावर्षीही अफवांचे सुमारे १०० दूरध्वनी मुंबई पोलिसांना आले होते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात अशा धमक्यांच्या दूरध्वनीने शंभरी गाठली होती. नुकतीच रिझर्व बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा दूरध्वनी आला होता.
हा दूरध्वनी रिझर्व बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर आला होता. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतः ‘लश्कर-ए-तैयबा’चा सीईओ असल्याचा दावा केला होता.
अभिनेता सलमान खान व शाहरुख खान यांनाही धमकीचे संदेश व दूरध्वनी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही मारण्याची धमकी देणारा संदेश पोलिसांना प्राप्त झाला होता.
एका महिलेनेही यापूर्वी ३० हून अधिक वेळा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे पोलिसांना अशा दूरध्वनींमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्यावर्षी देशभरात विमानांबाबत धमक्यांचे २०० हून अधिक संदेश प्राप्त झाले होते. ऑक्टोबरच्या १५ दिवसांतच ७० हून अधिक धमकीचे संदेश प्राप्त झाले होते.
आयपी ॲड्रेसनुसार काही संदेश लंडन, जर्मनी व फ्रान्स येथील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी त्यासाठी व्हीपीएन सुविधेचा वापर करीत असल्याचा संशय आहे.