मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात
Dhananjay Munde's foot gets deeper after resigning from the ministerial post

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख यांना हाल हाल करुन त्यांची हत्या करण्यात आली होती.
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर आता धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे ट्वीट करत सांगितले.
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. आता या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी एक मोठी मागणी केली आहे. धनंजय मुंडेंना याप्रकरणी सहआरोपी करा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
“जे फोटो काल समोर आले त्यानंतर लोक भावनिक झाली. यामुळे सरकारला झुकावं लागलं. गुडघ्यावर यायला लागलं. हे फक्त सर्वसामान्य लोकं आणि देशमुख परिवाराने जो लढा लढला त्यामुळे झाले.
सरकारने याचं क्रेडिट घेऊ नये. तसेच धनंजय मुंडेंनीही याचं क्रेडिट घेऊ नये की मी नैतिकता म्हणून राजीनामा देतो. कारण तीन महिने तुम्ही फक्त टाईमपास केला, अंहकार दाखवला आणि सामान्य लोकांनी तुमचा अहंकार मोडला हे खरं आहे”, असे रोहित पवार म्हणाले.
“सरकारला असं वाटतंय की इतके आमदार निवडून आले आहेत की लोकांनी विरोध करो किंवा आंदोलन करु किंवा विरोधकांनी विरोध करो किंवा आंदोलन करावे काहीही फरक त्यांना पडत नव्हता.
पण लोकांनी तीव्र निषेध केल्यानंतर आणि देशमुख परिवाराने जो लढा लढला त्यामुळेच सरकारला झुकावे लागले. दुर्दैव इतकंच आहे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानतंर तो व्यक्ती परत येऊ शकत नाही,
पण न्याय मिळायला सुरुवात झाली, असं आपल्याला म्हणावं लागले. असाच न्याय आपल्याला सुर्यवंशी कुटुंबालाही द्यायचा आहे. पण देशमुख कुटुंबाची आणि सर्वसामान्यांची अजून एक मागणी आहे की धनंजय मुंडे यांना सहआरोपी करायला हवं.
कारण त्या कंपनीकडून पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती, असं भाजपचा आमदार पुराव्यासह जर म्हणत असेल तर मग सहआरोपी करुन पारदर्शकपणे याची चौकशी होणं तितकंच महत्त्वाचे आहे”, असेही रोहित पवारांनी म्हटले.
“तुम्ही अडीच महिने झोपला होतात का, ही नैतिकता तुम्हाला दिसली नाही का? हे फोटो आणि चर्चा व्हिडीओ हे दीड महिन्यांपूर्वी या गोष्टी दिसल्या नाहीत का, आज तुम्ही नैतिकतेचे पतंग उडवायला लागले आहात. आज झोपेतून तुम्ही जागे झालात का?” असा सवालही रोहित पवारांनी केला
“तुम्ही मुख्यमंत्री आहात, मग काय भजी तळत होता का? कोणालाही उभे करण्याची ताकद आहे तुमच्याकडे. मग आधीच राजीनामा का घेतला नाही. तुम्ही खोलात जाऊन जर चर्चा केली.
फोन चेक केले. सीडीआर चेक केला तर कदाचित काहीतरी मिळेल. जर मंत्री असतील तर काय तपास होणार आहे. धनंजय देशमुख म्हणाले पोलीस जर नसते,
तर भाऊ वाचला असता. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर आज ते जिवंत असते. मात्र पोलिसच यात कुठेतरी आहेत. राजकीय व्यक्तीकडे दुर्लक्ष केले. तर पदावरून पाय उतार व्हावे लागेल”, असेही रोहित पवार म्हणाले.