मराठवाड्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
A male teacher along with a female teacher attempted self-immolation in front of the District Collector's Office in Marathwada.

जालन्यात एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
जालन्यात अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर एका महिला शिक्षिकेसह पुरुष शिक्षकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.
मात्र पोलिसांच्या उपस्थितीमुळे यावेळी मोठ्या अनर्थ टळला असून पोलिसांनी एका महिला शिक्षिकेसह चार ते पाच पुरुष शिक्षकांना ताब्यात घेतलय.
अंशतः अनुदानित शिक्षकांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर “सामुदायिक आत्मदहन” या शीर्षकाखाली धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी खबरदारी म्हणून अग्निशमन दलाचा एक बंबही तयार ठेवण्यात आला होता.
विनाअनुदानित शिक्षकांना २० टक्के अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा देण्यात यावा असा १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णय निर्गमित केला होता.
मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं या अर्थसंकल्पात यासाठी कुठलिच तरतूद केलेली नाहीये. यासाठी विना अनुदानित शिक्षकांच्या वतीनं आंदोलनं केली गेली. मात्र अद्याप यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.
दिलदार नेता म्हणून ऊपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यी महाराष्ट्रात ख्याती आहे, हाकेला धावून जाणारा नेता म्हणून आपली ओळख आहे.
परंतु ६३ हजार शिक्षकांच्या मागण्यांना आपण का गांभीर्याने घेत नाही हा प्रश्न समस्त विनाअनुदानीत शिक्षकांना पडला आहे. शिक्षकांवर अर्थ खात्यांकडून वेळोवेळी अन्याय होत आहे.
मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री सकारात्मक आहेत फक्त अर्थमंत्री म्हणून अजित दादांकडे शिक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत.
येत्या दोन दिवसात अर्थमंत्री अजित पवार यांनी आमच्या मागण्यांचा विचार केला नाही, असा आरोप करून महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी शिक्षकांनी दिला.
जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर विना अनुदानित शिक्षक संघाच्या वतीनं सामूहिक आत्मदहन मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आमच्या मागण्या लवकर मंजूर केल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा शिक्षकांनी दिला आहे. यावेळी जिल्हाभरातून शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.