पहेलगाम हल्ल्यावरून शिवसेनेचा मोदींवर संताप , तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो
Shiv Sena's anger at Modi over Pahelgam attack, you fight, we take care of clothes

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय नागरिकांमध्ये पाकिस्तानविरोधात असंतोष आहे. पाकड्यांना धडा शिकवण्याची मागणी सातत्याने होत आहे. आज या हल्ल्याला 10 दिवस उलटून गेले आहे. सीमेवर तणाव आहे.
पाकिस्तानमध्ये युद्धाची तयारी स्पष्ट दिसत असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या नेतृत्व क्षमतेवरच निशाणा साधला आहे.
पहलगाम हल्ल्यात निरपराध 27 लोक मारल्या गेली. देशात संतापाची लाट आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला जे काही करायचे ते करा अशी सूट दिली आहे.
त्यावर खासदार राऊत यांनी पंतप्रधानांवर जळजळीत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व गुण आणि क्षमतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, असाच हा प्रकार असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.
म्हणजे युद्धात उजवे ठरलो तर श्रेय घेण्यासाठी हे पुढे येतील. तर चूक झाली तर सैन्यावर खापर फोडतील. पंतप्रधानांमध्ये राजकीय नेतृत्व गुण नाही. जे होईल, त्याची जबाबादारी घेण्याची कुवत नाही.
हे पोकळ नेतृत्व असल्याचा घणाघात त्यांनी घातला. लष्काराला कारवाईसाठी मुभा दिली. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळू असा हा प्रकार आहे.
श्रेयासाठी पुढे आणि गडबड झाली तर मी तुमच्यावर विश्वास टाकला होता, असे म्हणून ते नामनिराळे होतील, असा प्रहार संजय राऊत यांनी केला.
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याबाबत जनरल मानकेशॉ यांना थेट विचारले तुम्हाला हल्ला करण्यासाठी किती दिवस लागतील.
त्यांनी सांगितले की, पाकिस्तानवर हल्ला करायचा आहे. हे नेतृत्व गुण असते. इंदिरा गांधी यांनी जबाबदारी घेतली याची आठवण राऊतांनी करून दिली.
पहलगाममध्ये हल्ला झाला. त्यात 27 लोक मारल्या गेले. पंतप्रधान मोदी हे बिहार दौऱ्यावर प्रचारासाठी जात आहेत. ते इतर ठिकाणी गेले. ते काल मुंबईत आले.
त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही. ते बॉलिवूड अभिनेत्यांसोबत, अभिनेत्रींसोबत 9 तास होते. टाळ्या वाजवत होते. देशावर हल्ला झाला असताना ते हा कार्यक्रम रद्द करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही, अशी टीका त्यांनी केली.
सरकार दहशतवादाविरोधात जी काही कारवाई करेल, त्यासाठी सरकाराला आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. पण सरकारच्या चुकांना आमचे समर्थन नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी सुद्धा मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण याचा अर्थ चुकांना समर्थन थोडचं करणार असा सवाल त्यांनी केला. त्यांनी मित्रपक्षांना सुद्धा चिमटे काढले.
त्यांनी यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची पुन्हा मागणी केली. मुंबई दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील आणि राज्यातील गृहमंत्री आर आर पाटील यांचा राजीनामा घेतला होता ना?
मग आता अमित शाह यांचा राजीनामा का मागत नाही, असा सवाल त्यांनी केला. आबांचा राजीनामा घेतला होता की नाही, असा सवाल त्यांनी शरद पवार यांना केला. मग आता अमित शाह यांचा राजीनामा मागण्यात चूक काय असा सवाल त्यांनी केला.