काका-पुतणे एकत्र येणार ? शरद पवारांच्या एका वाक्याने चर्चांना उधाण
Will uncle and nephew come together? Sharad Pawar's one sentence sparks debate

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत.
शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले. मात्र, त्याच वेळी शरद पवार यांच्या एका वक्तव्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शरद पवार यांनी मागील इतक्या वर्षात जो निर्णय घेतला नाही, तो निर्णय घेण्याची वेळ आलीय का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज सकाळपासून पुण्यातील मोदीबाग इथे आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी महत्त्वाचे राजकीय भाष्य केले.
त्यांचं वक्तव्य हे पुन्हा राजकीय भूकंप करणार का अशी चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत भाष्य केले.
शरद पवार यांनी काय म्हटले?
शरद पवार यांनी म्हटले की, सगळ्यांची विचारधारा एक आहे त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको.
याचा निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे. त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे. मी निवडणूक लढणार नाही. त्यामुळे मी या प्रक्रियेत नसल्याचेही पवारांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी आता आपण राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत नसणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता शरद पवार राजकीय निवृत्ती घेणार का, य़ाची चर्चा सुरू झाली आहे.
शरद पवार यांनी आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याशिवाय, शरद पवार यांनी याआधी देखील एका कार्यक्रमात आपल्या राजकीय निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता.
मात्र, त्यावेळी एकसंध असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. मात्र, अजित पवारांनी शरद पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता.
अजित पवारांनी राष्ट्रवादीत फूट पाडून स्वतंत्र चूल मांडली. त्यानंतर शरद पवार पुन्हा अधिक सक्रिय झाले. लोकसभेत शरद पवारांना यश खेचून आणले.
तर, विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. या पराभवानंतर शरद पवार हे सक्रीय झाले आणि राज्यात दौरा सुरू केला.
आता मात्र, शरद पवारांनी आपण निर्णय प्रक्रियेत नसल्याचे सांगत राजकीय निवृत्ती घेत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शरद पवार यांच्या राज्यसभा खासदारकीचा जवळपास दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे.
“भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. दोन्ही राष्ट्रवादींनी भविष्यात एकत्र यायचं की नाही? हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवायचं आहे.
मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत. आमचे दिल्लीतील खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत”,
असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यावर माजी मंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवलाय. त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल. हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशीच इच्छा मी व्यक्त करतो.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे, पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढलेत, त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज आहे असं वाटत नाही.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.
मी काही यावर अधिक बोलू शकत नाही. आम्ही कार्यकर्ते आहोत त्यावर भाष्य करणे उचित नाही. वरिष्ठ निर्णय घेतील त्यांच्या सोबत आम्ही राहू. मी त्याच्यावर मत व्यक्त करणे माझ्या स्तरावर उचित होणार नाही.
राष्ट्रवादी सोबत आपण जायला हवं, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सोलापूर जिल्ह्यातील आमदार आग्रही आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील आमदार अभिजीत पाटील, नारायण पाटील, उत्तमराव जाणकर, राजू खरे यांनी शरद पवारांना भेटून आपण राष्ट्रवादीत गेल पाहिजे अशी विनंती केली होती.
विरोधी पक्षात असताना मोठ्या प्रमाणात निधीच्या अडचणी येत असल्याची आमदारांची भावना आहे. सदर आमदारांकडून वारंवार अजित पवारांची भेट घेण्यात आल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
आगामी काळात अजित पवारांसोबत गेल्यास मतदारसंघ टिकवता येईल, लोकांची कामे करता येतील अशी आमदारांची भावना असल्याचं बोललं जातंय.
जर आत्ताच आपण प्रवेश केला नाही तर आगामी काळात आपले मतदारसंघातील विरोधक सत्ताधारी पक्षासोबत जातील आणि पुन्हा निवडून येण अडचणीच होऊ शकेल अशी आमदारांची मानसिकता आहे.