अजितदादा मुख्यमंत्री होणार’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
'Ajitdada will be the Chief Minister' creates a stir with the statement of a big leader

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर केलेल्या विधानाची राज्यभरात चर्चा झाली होती. मलाही अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण योग येत नाहीये,
असं अजित पवार हसत-हसत म्हणाले होते. दरम्यान, नांदेडमधील मोठे नेते तथा माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर यांनी अजितदादांना मुख्यमंत्रिपद मिळणार, असं भाकित केलं आहे.
नांदेडमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भास्करराव खतगावरकर बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं. विशेष म्हणजे सध्या मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे भविष्यात दिल्लीत जाणार आहेत, असंही भाकीत त्यांनी केलंय.
“दादा माझं भाकीत खरं होतं. मी अशोक चव्हाण यांना म्हटलं होतं तुम्ही मुख्यमंत्री व्हाल ते मुख्यमंत्री झाले. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये राजकीय चर्चा होते.
तिथे अशी चर्चा आहे की येत्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणीस दिल्लीला जातील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल,” असं खतगावकर म्हणाले आहेत.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही नांदेडमध्ये सत्कार घ्यावा अशी विनंतीही खतगावकर यांनी अजित पवार यांना केली.
काही दिवसांपूर्वी अजित पवार मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यात महिलेला मुख्यमंत्रिपद मिळायला हवे, अशा आशयाची भावना व्यक्त केली.
तसेच मलाही अनेक वर्षांपासून वाटतं की मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.
खतगावकर यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाविषयी विधान केल्यानंतरही अशाच वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या.
विरोधकांनी तर त्यांना महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली होती. अजितदादा जोपर्यंत भाजपासोबत आहेत, तोपर्यंत त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकणार नाही.
त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीत यावे. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण होईल, अशी थेट ऑफरच ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिली होती.