भुजबळांच्या मंत्रिमंडळातील एंट्रीने ‘या’ ३ नेत्यांची पोटदुखी वाढली

Bhujbal's entry into the cabinet has increased the stomachache of 'these' 3 leaders

 

 

 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुंबई इथं राजभवनात आज सकाळी कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील गच्छंतीनंतर रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागली.

 

मुंबईत पार पडलेल्या या शपथविधीमुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या तीन नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण अनेक वर्षे मंत्रि‍पदाचा अनुभव असणारे छगन भुजबळ हेदेखील आता पालकमंत्रिपदासाठी दंड थोपटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाही आग्रही आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने पालकमंत्रिपद आपल्याकडेच असावं, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे.

 

तर दुसरीकडे, शिवसेनेचे वजनदार नेते असलेले दादा भुसे याच जिल्ह्यातून येत असल्याने पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी तेही प्रयत्नशील आहे.

 

यातच नाशिकमध्ये लवकरच कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येणार असल्याने या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी भाजपकडूनही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भाजपकडून गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर असून प्रजासत्तादिनी त्यांच्या हस्तेच जिल्ह्यात झेंडावंदनही पार पडले होते.

 

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन या तीन नेत्यांमध्ये नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी चढाओढ सुरू असतानाच छगन भुजबळ यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतल्याने आता या स्पर्धेत नव्या भिडूची एंट्री झाली आहे आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा महायुतीकडून नेमका कसा सोडवला जाणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

 

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदांवरून महायुतीत गेल्या काही महिन्यांपासून ओढाताण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तब्बल तीन आठवड्यांनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाओस दौऱ्यावर जाण्यापूर्वी १९ जानेवारीला पालकमंत्रिपदांची यादी जाहीर करण्यात आली होती.

 

परंतु, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजीनाट्य सुरू झाले होते. महायुतीतील राज्यमंत्र्यांना पालकमंत्रिपद मिळाले असताना शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना नाशिक जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले नाही.

 

दरम्यान, दादा भुसेंच्या ऐवजी भाजपचे नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना पालकमंत्रिपद दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला २४ तासांतच स्थगिती दिली होती.

 

त्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीसह शिवसेनेकडून दावा केला गेला. मात्र रायगडसह नाशिकचा विषय अजूनही प्रलंबित राहिल्याने प्रशासकीय पातळीवर निराशा, तर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

 

 

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी देखील बोलून दाखवली होती. मात्र त्यानंतर अखेर भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं आहे. भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

 

मला काल मीडियाने विचारले, तुम्ही म्हणाले होते, ‘जहा नही चैना वहा नही रेहेना’ मग मी म्हणालो ‘देर आये दुरुस्त आये’ काही लोक थोड्या वेळ या घरात तर थोड्या वेळ त्या घरात असतात, अशा लोकांना हे दु:ख कळणार नाही.

 

मागच्या मंगळवारी आमची बैठक झाली आणि तेव्हाच ठरलं होतं की शपथ घ्यायची आहे, पण मी कोणालाच नाही सांगितलं, असा गौप्यस्फोट यावेळी भुजबळ यांनी केला आहे.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की, मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यावेळीच सांगितलं होतं की दुरुस्त करायला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रयत्न केले.

 

माझ्या पेक्षा जास्त आनंद तुम्हा सगळ्यांना झाला, हा साप शिडीचा खेळ आहे. थोडं वर गेलं की खाली देखील येतं. चालूच असतं, त्याला कोण काय करणार. कधीकधी अशा गोष्टी पण घडतात ज्याचा तुम्ही कधी विचारही केलेला नसतो.

 

पुढच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत, आम्ही जेलमध्ये अडकलो होतो तेव्हा देखील आत बसून आपले लोक सभापती केले. तुम्ही जर अजितदादांच्या जास्त जागा निवडणून दिल्या तर फयदा आहे.

 

आता सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणूक लढायची आहे. अजितदादांनी सुद्धा सांगितलं आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जाणार, सगळ्यांना सोबत घेऊन महानगर पालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची आहे.

 

निवडणुकीत सगळ्यांना संधी द्यावी लागेल, पडला तरी चालेल पण तो घटक आपला आहे. सगळ्यांसाठी प्रयत्न करायचे तुम्ही सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत लोकांमध्ये राहायला हवं, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात बुधवारी रात्री एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. अधिकाऱ्यांनी ही रक्कम आमदारांच्या समितीला देण्यासाठी जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता.

 

या प्रकरणावरुन शिवसेना उबाठा नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाला आणि आमदार अर्जुन खोतकर यांना घेरले आहे. सरकारी जागेत पैसा जमा होत आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते काय करत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

 

 

संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात शासनाची जी विकास कामे झाली आहे, ती योग्य प्रकारे झाली की नाही? ते तपासण्याचे काम अंदाज समिती करत असते. परंतु, धुळे जिल्ह्यात या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झाला आहे.

 

भ्रष्टाचार झाला आहे. यामुळे शिवसेना नेते आमदार अर्जून खोतकर यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर १५ कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराने घेतली. गेल्या तीन दिवसांपासून ही रक्कम जमा होत होती. पाच कोटी रुपये जमा झाले होते. उर्वरित १० कोटी नंतर जमा होणार होते, असे राऊत यांनी म्हटले.

 

 

शिवसेना नेते आमदार अर्जून खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते म्हणाले, ही समिती विशेषता समितीचे अध्यक्ष अर्जून खोतकर किती भ्रष्ट आहे, ते समोर आले आहे. १५ कोटी जमवण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर खोतकर यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआयकडे देण्याची गरज आहे.

 

आमदार अनिल गोटे यांचे कौतूक करत संजय राऊत यांनी सांगितले की, माजी आमदार अनिल गोटे आणि शिवसैनिकांचा दबाव वाढल्यावर हे प्रकरण उघड झाले. या प्रकरणात अडकलेले काही लोक फरार झाले आहेत.

 

अंदाज समितीचे अध्यक्ष फरार झाले का? हे पाहावे लागले. परंतु या माध्यमातून गेल्या वर्षभरात आणि त्याच्या पूर्वीच्या अडीच वर्षात अंदाज समितीचे दौरे कुठे, कुठे झाले, त्यात काय काय झाले, हे सर्व पाहवे लागणार आहे, असे राऊत यांनी म्हटले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *