ठाकरेंना मोठा धक्का;’प्रामाणिक शिलेदारांनी’च साथ सोडली
Big shock to Thackeray; only 'honest Shiledars' left their support
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील माजी नगरसेवकांसह १०० पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश केला. यामुळे नवी मुंबईतील उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
यामध्ये माजी नगरसेवकांसह विद्यमान शहरप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांचा समावेश आहे. आतापर्यंत शिवसेनेचे प्रामाणिक शिलेदार म्हणून हे सर्व ओळखले जात होते. त्यांनीही अखेर शिंदे गटात प्रवेश केल्याने नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाल्याचे बोलले जाते.
शिवसेनेत दोन गट पडल्यावर शिवसैनिकांनी आपापली बाजू शोधली होती. नवी मुंबईतील निम्मे शिवसैनिक उद्धव ठाकरे गटात, तर निम्मे शिंदे गटात गेले होते.
मात्र आता ठाकरे गटातील माजी नगरसेवक आणि विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिंदे गटाची वाट धरली. सानपाडा येथे संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात या शिवसैनिकांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.
यात माजी नगरसेवक मनोहर जोशी, माजी नगरसेवक आणि विद्यमान शहरप्रमुख विजय माने, उप जिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, मिलिंद सूर्यराव, विभागप्रमुख संतोष पाटील आदींसह सुमारे १०० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यावेळी आयोजित मेळाव्याला शिवसेना ठाणे संपर्क प्रमुख नरेश मस्के, जिल्हाप्रमुख विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नाहाटा, यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका आणि शिंदे गटातील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
नेरूळ विभागातील हे माजी नगरसेवक कार्यक्षम म्हणून ओळखले जात असल्याने त्यांचा प्रभागात वेगळा दबदबा आहे. याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे. सानपाडा विभागातील नगरसेवकही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.