शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत शितो रियू असोसिएशनचे घवघवीत यश!

Resounding success for Shito-Ryu Association at the school-level kickboxing competition!

 

 

 

मुंबई उपनगर जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत शितो रियू स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या ( एस एस के के ए ) खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 

या स्पर्धेत असोसिएशनच्या दोन महिला खेळाडूंनी पदकांची कमाई करत आपल्या कौशल्याचा आणि मेहनतीचा ठसा उमटवला.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने अंधेरी येथील गोंदवली बीएमसी स्कूल येथे या जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

मुंबईतील विविध शाळांमधील खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतींमध्ये खेळाडूंनी आपले क्रीडा कौशल्य सादर केले.

 

या स्पर्धेत ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल, चुनाभट्टी येथील प्रिशा पिल्लई हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली

 

आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर कर्नाटक हायस्कूल, चेंबूर येथील काव्या शिंदे हिनेही आत्मविश्वासपूर्ण खेळ करत रौप्यपदकाची कमाई केली.

 

या यशस्वी खेळाडूंना शिहान उमेश मुरकर, विघ्नेश मुरकर आणि राहुल साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभत आहे.

 

खेळाडूंच्या तांत्रिक कौशल्याबरोबरच शिस्त, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यावर असोसिएशनकडून विशेष भर दिला जातो.

 

दोन्ही खेळाडूंनी मिळवलेले हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे, कठोर परिश्रमाचे, जिद्दीचे आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे फलित आहे.

 

विशेषतः मुलींनी क्रीडा क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत जिल्हास्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

 

 

Related Articles