रात्री २ वाजता दिल्लीहून ठरला अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश
Ashok Chavan's BJP entry was decided from Delhi at 2 pm

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यांचा पक्षप्रवेश झाला.
मराठवाड्यात जंगी सभा, जोरदार शक्तिप्रदर्शन करुन भाजप प्रवेश करण्याचा चव्हाणांचा मानस होता. माजी मुख्यमंत्री असल्यानं पक्षप्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा उपस्थित असावेत अशी त्यांची इच्छा होती.
पण दिल्लीतून निरोप आल्यानंतर मुंबईत छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते.
अशोक चव्हाण यांना भाजपकडू राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
त्याच मध्यरात्री २ नंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्लीतून फोन आला. चव्हाण यांचा पक्षप्रवेश मंगळवारीच उरकण्यात यावा, अशा सूचना बावनकुळेंना मिळाल्या.
त्यानंतर लगेचच मुंबईत फोनाफोनी सुरू झाली आणि घडामोडींना वेग आला. बावनकुळेंनी दिल्लीहून मिळालेली माहिती चव्हाण यांना फोन करुन दिली.
मी भाजपमध्ये बिनशर्त गेलो आहे. मला पदाची कोणतीही अपेक्षा नाही, असं अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणाले. माझं राज्य, माझा जिल्हा यांच्या विकासासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
पक्षादेश माझ्यासाठी अंतिम असेल. देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणे काम करेन, असं चव्हाण यांनी म्हटलं. फडणवीस यांनी चव्हाणांचं पक्षात स्वागत केलं.
अशोकरावांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा सरकार आणि प्रशासन चालवताना होईल. त्यांना पक्षात सन्मानाचं स्थान दिलं जाईल. काँग्रेसला ज्येष्ठ नेत्यांना सांभाळता येत नाहीत. पक्षानं आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं फडणवीस म्हणाले.
दोनदा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाणांना सध्याच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हायचं होतं. तशी इच्छा त्यांनी भाजप नेत्यांकडे बोलून दाखवली होती.
महसूल, सार्वजनिक बांधकाम विभागांसह उपमुख्यमंत्रिपदासाठी ते आग्रही होते. वाटाघाटींमध्ये त्यांनी आपली मागणी सांगितली.
पण एकाच पक्षातील दोघे उपमुख्यमंत्री असल्यास पक्षामध्ये दोन सत्ताकेंद्रं तयार होतील. त्याचा फटका बसेल, असा धोका फडणवीसांनी सांगितला.
मराठा नेते असलेले चव्हाण मोठे झाल्यास, त्यांचं प्रस्थ वाढल्यास आपलं राजकारण धोक्यात येईल अशी भीती असल्यानं फडणवीसांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कडाडून विरोध केला.