BREAKING NEWS; 15 फेब्रुवारी रात्री 10 वाजता परभणीचा उर्स संपणार ;जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Urs Yatra will end at 10 pm on February 15; District Magistrate orders
मागील 13 दिवसापासून उरुस यात्रा ही शांततेत सुरु आहे. परंतू काही तरुणांनी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याने वातावरण खराब होण्याची शक्यता होती. पोलीस विभागाने सर्व प्रकरणांवर लक्ष ठेवलेले असून, सर्व प्रकरणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
महान सुफी संत हजरत सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांची परभणी येथील दरगाह सर्व धर्म समभावाचे, एकात्मतेचे प्रतिक असून, सर्व जिल्हावासियांची श्रद्धास्थान आहे.
सध्या हजरत तुराबुल हक साहेब दर्गा येथे दरवर्षी प्रमाणे उरुस यात्रा (वार्षिक मेळावा) सुरु आहे. संपूर्ण राज्य आणि देशभरातील भक्त दरवर्षी दर्शन आणि उरुस यात्रेसाठी दर्ग्यात येतात. दिवसापासून उर्स पंधरा दिवसाचा करण्यात आला होता .
मात्र परभणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिस दलाने केलेल्या विनंतीप्रमाणे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हा दंडाधिकारी या नात्याने
हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या उर्साचा गुरुवार 15 फेबु्रवारी रोजी रात्री दहा वाजल्यापासून समारोप करावा, असे आदेश बजावले आहेत.
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणार्या या उर्सास यावर्षी 1 फेबु्रवारीपासून मोठ्या हर्षोल्हासात प्रारंभ झाला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाने परंपरेप्रमाणे मानाचा संदल काढला.
त्या पाठोपाठ विविध संस्था, प्रतिष्ठाने, संघटनांच्या वतीनेसुध्दा मोठ्या उत्साहाने संदल काढण्यात आले. तुरतपीरच्या दर्गाहच्या दर्शनासह उर्सातसुध्दा दररोज हजारो भाविकांची गर्दी उसळू लागली.
त्यामुळेच या वर्षीही उर्स भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत होता. जिल्हा पोलिस दलाने या उर्सात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, या दृष्टीने सर्वतोपरी बंदोबस्त तैनात केला होता.
त्यामुळे उर्सा दरम्यान कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. परंतु, 9 फेबु्रवारी रोजी तरुणांच्या दोन गटात वाद-विवाद झाला अन् किरकोळ हाणामारी झाली.
तर 10 फेबु्रवारी रोजी 11.30 च्या सुमारास एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर भावना दुखावतील अशा पोस्ट स्टेटसला ठेवल्या होत्या. त्यामुळे संबंधित विद्यार्थी व काही युवकांमध्ये वाद झाला.
त्याचे पर्यासन जिंतूर रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात झाले. त्याच दिवशी रात्री उर्सात दोन गटातील काही युवकांनी समोरासमोर येवून नारेबाजी केली.
वास्तविकतः जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचा आदेश जारी केला होता. त्या आदेशाचे खुलेआमपणे उल्लंघन करण्यात आले. तसेच सोशल मिडीयामधूनसुध्दा वारंवार आवाहन केल्यानंतरसुध्दा उलटसुलट क्लिप्स व्हायरल होत होत्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने ताण-तणावाचे वातावरण निर्माण होवू नये, कोणत्याही शुल्लक घटनेतून दोन समाजात तेढ निर्माण होवू नये,
या दृष्टीकोनातून जिल्हाधिकार्यांना एक पत्र पाठवून या उर्साच्या समारोपाची विनंती केली. जिल्हाधिकार्यांनी या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या
अहवालाप्रमाणे उर्सातील सर्व कार्यक्रम व दुकानांची अनुज्ञाप्तीसाठी देण्यात आलेली परवानगी 15 फेबु्रवारी रात्री 10 वाजल्यापासून रद्द केली आहे.