उद्या काय होईल, ते सांगता येत नाही; बावनकुळेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
There is no telling what will happen tomorrow; Bawankule's statement increased the suspense

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आपला पक्ष बळकट करण्यासाठी विरोधी पक्षातील बड्या आणि प्रभावशाली नेत्यांना आपल्या गोटात खेचण्यास सुरुवात केली आहे.
याचाच एक भाग म्हणून गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश पार पडला होता. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
आणि शरद पवारांच्या जवळचा मोठा नेता भाजपमध्ये जाणार असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यापैकी शरद पवारांच्या जवळचा नेता या चर्चेचा रोख जयंत पाटील यांच्या दिशेने असल्याचे सांगितले जाते.
जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेनेही चांगलाच जोर धरला आहे. शरद पवार गटाकडून स्पष्टीकरण येऊनही जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे.
तर नितेश राणे यांनी वडेट्टीवारांना उद्देशून, ‘भविष्यात तुमचा आणि आमचा बॉस एकच असू शकतो’, असे सूचक वक्तव्य केले होते.
या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार हे दोन नेते भाजपमध्ये येणार आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यापैकी जयंत पाटील यांच्याविषयी बोलताना
बावनकुळे यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला साथ देण्यासाठी कोणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊ.
पण मला याबद्दल कुठलीही माहिती नाही. जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. ते माझ्या संपर्कात नाहीत. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काहीही बोलणार नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले.
विजय वडेट्टीवार यांच्याविषयी नितेश राणे यांनी काय ट्विट केले, ते मला माहिती नाही. पण विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटील आमच्या संपर्कात नाहीत.
पण उद्या काय होईल सांगता येत नाही, लोकांचे विचार दररोज बदलतात. मोदींच्या संकल्पनेला साथ देण्यासाठी आमच्याकडे येतील, त्या सगळ्यांचे स्वागत आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. याविषयी विचारल्यानंतर बावनकुळे यांनी म्हटले की,
महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसल्यानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल. अजून जागावाटप व्हायचे आहे. त्यामुळे कोण कुठून लढेल, ते आत्ताच सांगता येणार नाही, असे बावनकुळेंनी म्हटले.