जरांगे पाटील पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना; मुंबईत तातडीची बैठक
Jarange Patil left for Mumbai again; Urgent meeting in Mumbai
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठ्यांचा प्रभाव संपवायचा आहे, असा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी आज केला.
फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विरोधात कट रचल्याचा आरोप करत मनोज जरांगे उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थान सांगर बंगल्याकडे रवाना झाले आहेत.
मनोज जरांगे यांनी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे, मी रस्त्यात मलो तरी मला सागर बंगल्यावर न्या, असे देखील जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांची प्रकृती देखील खालावली आहे. उपोषण सुरु असताना जरांगे मुंबईकडे निघाले आहे. महाराष्ट्र सरकारने विषेश अधिवेशनात मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे.
मात्र हे आरक्षण मनोज जरांगे यांना मान्य नाही. ओबीसीतून आरक्षण द्या आणि सगेसोयरे संदर्भात कायदा करा, अशी मागणी करत मनोज जरांगे मुंबईकडे निघाले आहे.
“देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील मराठा समाजाचा प्रभाव संपवायचा आहे आणि त्यांना सेगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण करायचे आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार फडणवीसांपुढे हतबल आहेत. फडणवीसांच्या इच्छेशिवाय राज्यात काहीही होऊ शकत नाही.
फडणवीस देखील मराठा समाजात फूट पाडा आणि राज्य करा या राजकारणाचा वापर करत आहेत. अजय बारस्कर यांनी केलेल्या खोट्या आरोपामागे तेच सूत्रधार आहेत”, असे जरांगे-पाटील म्हणाले.
दरम्यान मनोज जरांगे मुंबईत येणार म्हणून मुंबईतील मराठा समाज देखील सतर्क झाला असून त्यांनी बैठक बोलावली आहे.
या सर्व प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्यास नकार दिला. माहिती घेऊन बोलतो असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे पोलीस मनोज जरांगे यांना अडवणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. मनोज जरांगे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, असे बच्चू कडू म्हणाले. मनोज जरांगे यांनी एक बैठक घ्यावी आणि नंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी, असे ते म्हणाले.
भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी नौटंकी बंद करावी, त्यांना आधी देखील सांगितलं होत.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करु नका. मराठा समाजावर देवेंद्र फडणवीस यांचे खूप उपकार आहेत, असे लाड म्हणाले. तर मनोज जरांगे सागर बंगल्यावर आले तर आम्ही शांत बसणार का?, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.