‘सपा’ नेते अबू आझमी यांची भाजपबरोबर जाण्याची तयारी
'SP' leader Abu Azmi is ready to go with BJP

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भाजपसोबत जाण्याचं सूतोवाच केलं आहे. भाजपने अटी मान्य केल्या तर तसा निर्णय घेऊ, नाहीतरी दोनवेळा आपल्याला आमंत्रण आलं होतं, असा खुलासा त्यांनी केला.
अबू आझमी हे गुरुवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. संविधान वाचवा-देश वाचवा या यात्रेच्या निमित्ताने ते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. जामनेर येथे बोलताना त्यांनी भाजपसोबत जाणयाचं सूतोवाच केलं आहे. मात्र त्यासाठी त्यांनी काही अटी घातल्या आहेत.
”भाजपने हिंदू-मुस्लिम धर्मियांमधील धार्मिक द्वेष थांबवला पाहिजे, केंद्र सरकारमध्ये मुस्लिमांना समन्माचं स्थान मिळालं पाहिजे,
महात्मा गांधींच्या खुन्यांचं कौतुक करणं थांबवलं पाहिजे, मुस्लिांना तुमचं कुटुंब माना.. या अटी भाजपने मान्य केल्या तर त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करु” असं अबू आझमी म्हणालेत.
यावेळी अबू आझमी यांनी आपल्याला भाजपने दोनवेळा आमंत्रण दिल्याचा दावा केला. केंद्र सरकार अल्पसंख्यक समाजावर अन्याय करत असून
शेतकरी, कष्टकरी, गोरगरीबांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अवस्थेवर त्यांनी टिपण्णी केली.
”शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारकडे कोणत्याही ठोस उपाययोजना नाहीत. त्यामुळे आत्महत्येचा आकडा वाढतच जातोय. एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होतोय तर दुसरीकडे उद्योगपतींचे लाखो कोटींचे कर्ज माफ केले जातेय.”
आझमी पुढे म्हणाले की, समाजवादी पक्ष स्वतंत्रपणे लोकसभेच्या निवडणुका लढणार असून आम्ही कोणाशीही युतीमध्ये नाहीत.
केंद्रातील भाजप सरकारने मुस्लिम समाजाला स्वतःच्या कुटुंबातील समजलं पाहिजे. त्यांनी आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करु, असं अबू आझमी म्हणाले.