बारामतीत भाजप पदाधिकाऱ्यांत निरुत्साह अजित पवारांसाठी टेन्शन
Tension for Ajit Pawar, discouragement among BJP office bearers in Baramati

साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडी आणि महायुतीने प्रचाराचा जोर वाढवण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार निश्चित झाल्याने काही प्रमाणात कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाला आहे.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोमाने प्रचाराला लागले आहेत. असे असले तरी वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात उभे ठाकलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारसंघातील अनेक तालुक्यांत अद्यापही समन्वय पाहायला मिळत नाही.
त्यामुळे भाजप कार्यकर्ते अद्यापही उत्साहाने प्रचारात सहभागी होत नसल्याने हीच मरगळ सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ, बारामती आणि पुणे या मतदारसंघांमध्ये महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
चंद्रकांत पाटील विविध मतदारसंघांमध्ये बैठका घेऊन महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीदेखील प्रत्येक बैठकीमध्ये नाराजी नाट्य समोर येत असून,
पदाधिकारी उमेदवाराबद्दल आणि सहकारी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत आहे. काहींना विधानसभेचे, जिल्हा परिषदेचे, महापालिकेच्या निवडणुकीबाबतचा
शब्द उमेदवाराकडून हवा आहे. यामुळे अद्याप तरी समन्वय बैठका घेऊनदेखील तितकाच समन्वय महायुतीच्या पक्षांमध्ये झालेला दिसून येत नाही.
बारामती मतदारसंघांमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून संपर्क दौरे सुरू आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या सध्या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
मात्र, या दौऱ्यादरम्यान भाजपचे काही बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते सहभाग घेत असल्याचं दिसून येत आहेत. काही काही ठिकाणी तर भाजप कार्यकर्ते फिरकतही नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
उमेदवारांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आम्हाला कोणताही निरोप मिळत नसल्याचं भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत.
दौऱ्याबाबतच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींमध्ये भाजप आमदार राहुल कुल यांचा फोटो नसणे, मागील वेळेस उमेदवार व बारामती मतदारसंघाची पूर्णपणे माहिती असणाऱ्या
भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा कांचन कुल यांचाही कुठे फोटो अथवा नामोल्लेख नसणे, तसेच कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे यांचे नावसुद्धा संपर्क म्हणून नसणे,
या सर्व गोष्टी भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचलेल्या नसल्याची चर्चा सध्या दौंडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींची दखल वरिष्ठ पातळीवर घेऊन भाजप कार्यकर्त्यांमधली
नाराजी दूर करून मरगळ घालवणे आवश्यक आहे,. अन्यथा ही मरगळ महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडू शकते.