8 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा हवामान खात्याचा इशारा
Meteorological Department warns of rain with lightning in 8 districts

राज्यामध्ये ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने ) झोडपून काढले आहे.
तर काही ठिकाणी वाढत्या तापमानमुळे नागरिक हैराण झाले आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहेत.
त्याचसोबत नागरिकांना काळजी घेण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढच्या दोन ते तीन तासांत राज्यातील पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी
विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले पिक निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले. भाजीपाला,
आंबा, संत्रे, कांदा, मका, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. अशामध्ये सरकारने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तर दुसरीकडे, राज्यातील जनता उकाड्यामुळे हैराण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर पोहचले आहे.
त्यामुळे वाढते तापमान आणि उकाड्यामुळे शरीराची लाहीलाही होत आहे. अशामध्ये काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे.
त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशामध्ये वाढते तापमानामुळे राज्यात उष्माघाताचे रुग्ण वाढत चालले आहे.
त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि ११ ते ३ च्या दरम्यान घराबाहेर पडू नये असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.