निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी केले जनतेला भावनिक आवाहन
Prakash Ambedkar made an emotional appeal to the people in the election

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं आहे.
तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर
यांनी बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन अकोल्यातील जनतेला केलं आहे. अकोल्यातील फतेह चौक येथील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.
औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून दंगलीचा माहोल आम्ही दोन ते तीन तासात संपवून टाकला, ही वस्तुस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
एक वेळ होती की, महाराष्ट्र या देशाला राजकारण आणि समाजाचा व्यवहार कसा असावा हे शिकवत होता. 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बाजार समितींचे गठण हे कायदेशीररीत्या केले.
आणि त्यामध्ये म्हटले की, शेतकऱ्यांचा माल हा बाजार समितींमध्ये विकला गेला पाहिजे, असा इतिहासाचा दाखलाही आंबेडकर यांनी दिला.
आंबेडकर म्हणाले की, नागरिकत्वाच्या मुद्द्याला धरून जो NRC आणि CAA आला आहे. हा असंविधानिक आहे. संविधान म्हणते की, जो या देशात जन्माला आला तो भारतीय नागरिक आहे,
त्याला कोणता पुरावा देण्याची गरज नाही. आता हे सरकार कागद मागत आहे. याचा अर्थ हा आहे की, तुमच्याकडे कागद आहेत, तर तुम्ही नागरिक आहात.
तुमच्याकडे कागद नसेल, तर तुम्ही तुरुंगात जाल. ही लढाई बाहेरून लढली जाऊ शकत नाही, काही लोक म्हणतात की, आम्ही न्यायालयात जाणार.
न्यायालय फक्त एवढच सांगू शकते की, हा कायदा संविधानिक आहे किंवा नाही, पण हा कायदा रद्द करायचा असेल, तर संसदच ते करू शकते, त्यासाठी कोणीतरी संसदेत जाऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.
आज ज्यांच्या मनात भीती आहे, त्यांना मी काही महिन्यांपासून म्हणत आहे की, लोकांना आतून बदल पाहिजे आहे. 24 लाख हिंदू परिवार 2014 पासून नागरिकत्व सोडून स्थलांतरित झाले आहेत की,
ज्यांची संपत्ती 50 करोडपेक्षा कमी नाही, या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मी इथल्या पक्षांना म्हणत होतो की, आता एक नवीन चेहरा दाखवणे गरजेचे आहे.
एकता दाखवणे गरजेचे आहे आणि एकता अशा संघटनांची दाखवणे गरजेचे आहे की, जी कधी भाजपासोबत समझोता करणार नाही, याचीही आठवण आंबेडकरांनी यावेळी करून दिली.
लोक आशा लावून होते की, हे सरकार बदल घडवेल, पण त्यांची निराशा झाली आहे. ते मतदानाला जात नाहीत. याचा अर्थ असा आहे की, जे धर्मनिरपेक्ष नागरिक आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की,
त्यांनी 100 टक्के मतदान करावे, तेव्हा बदलाला सुरुवात होईल. आपण जर भाजपला मतदान दिलं, तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं होईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
मुस्लिमांची लढाई ही NRC, CAA आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठीची आहे. मी आशा करत होतो की, काँग्रेस आमच्यासोबत समझोता करेल तो केला नाही, पण काँग्रेस पार्टी एवढं करू शकत होती की,
काही जागा या मुस्लिमांना देईल, पण राजस्थान असो किंवा अन्य ठिकाणी काँग्रेस जागा देत नव्हती. मुस्लिमांच्या प्रश्नांना जोपर्यंत धर्मनिरपेक्ष पक्ष उचलत नाहीत, तोपर्यंत या देशात शांती राहणार नसल्याचे आंबेडकरांनी सांगितलं आहे.