अजितदादांचा गौप्य्स्फोट ;म्हणाले २०१४ मध्ये शरद पवार भाजप सरकारमध्ये सामील होणार होते
Ajit Dada's secret blast: Sharad Pawar was going to join the BJP government in 2014
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सहकारी शरद पवारांबाबत वेगवेगळे गौप्यस्फोट करत आहेत,
शरद पवारांवर वेगवेगळे आरोप करत आहेत.
शरद पवार हे सातत्याने भाजपाच्या बाजूने भूमिका घेत होते, असा आरोप अजित पवार, प्रफुल्ल पटेल, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी केला आहे.
तसेच शरद पवार २०१४ च्या आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यावर भाजपाच्या बाजूने जाण्याबाबत बोलत होते,
असाही आरोप अजित पवार गटातील नेत्यांनी यापूर्वी केला आहे. दरम्यान, आता अजित पवार यांनी थेट शरद पवार यांचं नाव न घेता नवा गौप्यस्फोट केला आहे.
अजित पवार अमरावती येथे भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत केलेल्या भाषणावेळी म्हणाले, माझ्यासमोर युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे.
महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जाती-पाती आणि नात्यागोत्याचा विचार केला नव्हता. त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
राजांनी सर्व मावळ्यांना एकवटलं आणि त्यातून इतिहास निर्माण केला. हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. महाराजांचा हा इतिहास ऐकल्यावर आजही आपली छाती फुगते. असाच काही इतिहास लोकांना माहिती नाहीये.
अजित पवार म्हणाले, मी विकासाच्या मागे जाणारा कार्यकर्ता असल्यामुळे काही निर्णय घेतले. मी अनेकदा आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं, काही वेळा आमच्या वडिलधाऱ्यांनाही (शरद पवारांना) सांगितलं होतं.
अनेकांना माहिती नसेल की, २०१४ मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल यायच्या आधीच भारतीय जनता पार्टीला विधानसभेत बाहेरून पाठिंबा दिला होता.
त्यानंतर आपले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की काही दिवसांनी आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं आहे.
परंतु, कुठं काय खटकलं माहिती नाही. तेव्हा वरून केवळ आदेश यायचे आणि आम्ही फक्त त्या आदेशांची अंमलबजावणी करायचो.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतो. मला पहाटे पाच वाजता उठून सहा वाजता कामाला लागायची सवय आहे.
मी अक्षरश: माझ्या मतदारसंघात ६ वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. तेच सातत्य मी आजपर्यंत टिकवलं आहे. त्यामुळे मी कामाचा माणूस आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील दिवसाच्या २४ तासांतले १८ ते २० तास काम करतात. परदेशातून आले तरी आराम न करता कामाला लागतात.