प्रचारसभेत भाषण करतांना नितीन गडकरींना चक्कर आली
Nitin Gadkari got dizzy while speaking at a campaign rally
राज्यासह देशभरात प्रचंड उन्हाचा कडाका बघायला मिळतोय. एकीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. तर दुसरीकडे उन्हामुळे अनेक राजकीय नेत्यांना मोठी झळ बसताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भर सभेत चक्कर आल्याचाी घटना घडली होती. त्यानंतर आज यवतमाळच्या पुसद येथे अशीच एक घटना घडली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुसदमध्ये भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. पण संबंधित घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांना उन्हामुळे भोवळ आल्याची घटना घडली आहे.
त्यानंतर आजही त्यांना भर मंचावर भाषण करत असताना भोवळ आली आहे. नितीन गडकरी यांना भोवळ आल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरलं. अन्यथा ते जमिनीवर कोसळले असते.
महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज यवतमाळच्या पुसद येथे आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या आयोजनानुसार नितीन गडकरी भाषणासाठी आले. ते भाषण देत असताना अचानक त्यांना भोवळ आली. यावेळी मोठी तारांबळ उडाली.
नितीन गडकरी यांच्या अंगरक्षकांनी त्यांना पकडलं. तर इतरांनी तातडीने त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. यानंतर नितीन गडकरी यांना खुर्चीवर बसवण्यात आलं.
त्यानंतर त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर सभास्थळी ग्रीन रुममध्ये त्यांना बसवण्यात आलं आहे. त्यांची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
नितीन गडकरी यांना भाषण करत असताना अचानक भोवळ आल्यामुळे मंचावर असलेले पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांचा काळजाचा ठोका चुकला होता.
पण नितीन गडकरी आता त्यातून सावरले आहेत. त्यांची प्रकृती चांगली झाली आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांनी थोडासा आराम केल्यानंतर ते पुन्हा भाषणासाठी व्यासपीठावर आले.
त्यांनी जोरदार भाषण केलं. त्यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन यवतमाळच्या नागरिकांना केलं.