मोदींचा उद्धव ठाकरे,शरद पवारांवर हल्लाबोल
Modi will attack Uddhav Thackeray, Sharad Pawar
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली.
दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार आणि नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी सभा घेतली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांदा प्रश्नावरून शरद पवारांवर पलटवार केला आहे.
‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात कृषीमंत्री इथलेच होते, त्यावेळी शेतकऱ्यांना एक रुपया तरी मिळत होता का? आता शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळत आहेत. कांदा स्टॉक करण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे.
60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहे. 35 टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढली आहे, निर्यातीसाठीही आम्ही अनुदान दिलं आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
‘मी तिसऱ्या कार्यकाळासाठी आज तुमचा आशिर्वाद मागायला आलो आहे. एनडीएला मोठा विजय मिळणार आहे. काँग्रेसचा एवढा वाईट पराभव होणार आहे, त्यांना विरोधी पक्ष बनणंही कठीण होईल’, असा दावा नरेंद्र मोदींनी केला आहे.
‘महाराष्ट्राच्या एका नेत्याने सल्ला दिला आहे, निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं, यांना शटर बंद करायचं आहे. नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल,
तेव्हा मला सर्वाधिक आठवण बाळासाहेबांची येईल. नकली शिवसेनेने बाळासाहेबांचं स्वप्न संपवलं, बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिर होतं, बाळासाहेबांचं स्वप्न काश्मीरमधून 370 हटवायचं होतं,
सगळ्यात जास्त दु:ख नकली शिवसेनेला आहे. त्यांनी निमंत्रण नाकरालं, काँग्रेसने निमंत्रण नाकारलं. नकली शिवसेनेच्या पापाची पार्टनरशीप उघड झाली आहे’, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे.
‘ज्या काँग्रेसने सावरकरांना दिवसा ढवळ्या शिव्या दिल्या, त्यांना नकली शिवसेना डोक्यावर घेत आहे. नकली शिवसेनेत अहंकार आला आहे,
त्यांना त्यांची शिक्षा महाराष्ट्र देईल. चारही टप्प्यात जनतेने यांना चितपट केलं आहे,’ अशी टीका नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
‘आम्ही कुणाचा धर्म विचारला नाही, ना बघितला. सगळ्यांसाठी योजना बनवली. सगळ्यांना लाभ दिला. काँग्रेस विचाराने देशाच्या बजेटच्या 15 टक्के खर्च अल्पसंख्याकांवर खर्च केला’, असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.