मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचे नाव कसे ठरले ,शरद पवारांनी सांगितला किस्सा
Sharad Pawar told the story of how Uddhav Thackeray's name was decided as Chief Minister

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार हे राजकारणात कायमच चर्चेत राहिले आहेत, तर पवारांचं राजकारणही नेहमीच चर्चेत असते.
शरद पवार हे मुरब्बी राजकारणी असून राजकीय डावपेच व प्रसंगानुरुप निर्णयक्षमता हीच त्यांनी ओळख आहे. त्यामुळे, पुलोदचं सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री बनलेल्या शरद पवारांवर आजही पुलोदचं सरकार बनवण्यावरुन टीका होत असल्याचे दिसते.
पुलोदनंतर महाराष्ट्रातील 2019 च्या महाविकास आघाडी सरकारचेही शिल्पकार म्हणून त्यांच्याकडेच पाहिले जाते. शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करुन भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं.
त्यामुळे, अचानकपणे मुख्यमंत्रीपदाची माळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या गळ्यात पडली. मात्र, उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी कसं पुढे आलं, याचा किस्साच शरद पवारांनी सांगितला.
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, सत्ता स्थापन करताना मुख्यमंत्री कोणाला बनवायचं हा प्रश्न शिवसेनेसह इतही दोन्ही पक्षांपुढे होता. शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा सुरू होती.
मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यासंदर्भात आता स्वत: शरद पवारांनी विधिमंडळ बैठकीत घडलेला किस्सा सांगितला आहे.
मीडियाला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी एकनाथ शिंदेंचं नाव आमच्यासमोर आलं नव्हतं, असा गौप्यस्फोटही केला.
”मुख्यमंत्री कोणाला करायचं याबाबत त्यावेळी जी बैठक झाली, त्या बैठकीत आमच्याकडे एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा नव्हती. शिवसेना पक्षांतर्गत शिंदेंच्या नावाची चर्चा असेल, पण आमच्याकडे नव्हती.
आमची एकनाथ शिंदेंबाबत काही तक्रार नव्हती. आत्ताही ते आमच्यासोबत चांगले संबंध ठेवतात, पण त्यांच्यासोबत तेव्हा आमची जवळीक नव्हती. ज्यावेळी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली,
तेव्हा नेतृत्व कोणाला द्यायचं असा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी, सर्वजण गप्प बसले होते, माझ्या शेजारी उद्धव ठाकरे बसले होते. मग, मी उद्धव ठाकरेंचा हात हाती घेऊन उंचावला,
यांचा विचार करावा असंही सूचवलं. त्यावर, सर्वांनीच टाळ्या वाजवून दाद दिली, असा किस्सा शरद पवार यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचा स्वत:च्या मुख्यमंत्री पदासाठी आग्रह नव्हता,
असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बाळासाहेबांनंतर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्त्व मान्य केलंय. त्यामुळे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला
मी मुख्यमंत्री होण्याचं सूचवलं होतं. शिवसेनेमध्ये अंतर्गत एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा झाली होती, हे नंतर माझ्या लक्षात आलं, तत्पूर्वी आमचा कोणाचाच सहभाग त्यांच्यातील चर्चेत नव्हता, असेही पवार यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून होत होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे यांसह काही वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या नावाला विरोध केला होता.
एकनाथ शिंदे हे ज्युनिअर नेते आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही सिनियर नेते कसं काम करणार, असा प्रश्नही या नेत्यांनी उपस्थित केला होता,
अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, आता शरद पवार यांनीच उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी नेमकं कसं ठरलं, याचा किस्साच उलगडला.