प्रफुल्ल पटेलांची ईडीने परत केली जप्त 180 कोटींची मालमत्ता

Praful Patel's seized assets of 180 crores returned by ED

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांना मुंबईतील अपील न्यायाधिकरणाने मोठा दिलासा दिला आहे.

 

 

 

 

ईडीने काही काळापूर्वी प्रफुल पटेल यांची १८० कोटींची मालमत्ता जप्त केली होती, ही कारवाई अवैध असल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.

 

 

 

 

प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित वरळीतील सीजे हाऊस इमारतीतील चार मजल्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाच आणली होती.

 

 

 

 

दाऊद इब्राहिमचा विश्वासू इक्बाल मिर्ची कुटुंबियांशी या जागेचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत ‘ईडी’कडून तपास सुरू होता.

 

 

 

 

वरळीतील सीजे हाऊस या इमारतीमध्ये प्रफुल पटेल यांच्या मालकीचे चार मजले आहेत. ज्याची किंमत १८० कोटी असून प्रफुल पटेल

 

 

 

 

आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावे ही मालमत्ता आहे. प्रफुल पटेल, त्यांच्या पत्नी वर्षा आणि मिलेनियम डेव्हलपर या कंपनीच्या मालकीची घरे या इमारतीमध्ये आहेत.

 

 

 

 

दाऊद इब्राहिमचा सहकारी आणि अमली पदार्थांचा माफिया इक्बाल मिर्चीची पहिली पत्नी हजरा मेमनकडून सदर मालमत्ता विकत घेतली आहे, असा आरोप ईडीने लावला होता.

 

 

 

इकबाल मिर्ची ऊर्फ इकबाल मेमन हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपी आहे. २०१३ मध्ये त्याचा लंडन येथे मृत्यू झाला.

 

 

 

 

ही जागा वरळीमधील नेहरू तारांगणाच्या जवळ आहे. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने १५ मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव सीजे हाऊस असे आहे.

 

 

 

 

मुंबईतील न्यायाधिकरणाने ईडीने केलेला दावा फेटाळून लावला. प्रफुल पटेल यांची मालमत्ता मनी लाँडरिंग प्रकारात मोडत नसून त्याचा मिर्चीशी काहीही संबंध नाही, असेही नमूद केले आहे.

 

 

 

अपील न्यायाधिकरणाने पुढे म्हटले की, सीजे हाऊसमधील मेमन आणि त्याच्या दोन मुलांशी संबंधित असलेली १४ हजार चौरस फूटाची मालमत्ता

 

 

 

ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे प्रफुल पटेल यांची मालमत्ता जप्त करण्याचा विषयच नाही, कारण ते या गुन्ह्याशी संबंधित नाहीत.

 

 

 

 

प्रफुल पटेल यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतून बाहेर पडून स्वतःचा वेगळा गट केला, तेव्हाच शरद पवार गटाने त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचा आणि गुन्ह्यांचा उल्लेख केला होता.

 

 

 

भाजपा ही वॉशिंग मशीन असून आपल्यावरील डाग धुवून काढण्यासाठी भ्रष्ट नेते तिथे जातात, असे सांगितले गेले होते. अपील न्यायाधिकरणाने आता दिलेल्या निकालावरून विरोधक पुन्हा एकदा आरोप करण्याची शक्यता आहे.

 

 

 

या निकालानंतर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले की, अशा प्रकरणांमुळेच ईडीची विश्वासार्हता उरलेली नाही.

 

 

त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यास जागा आहेत. यावरून ईडी, केंद्रीय तपास यंत्रणा आणि सीबीआय या यंत्रणा भाजपाचेच विस्तारीत रुप आहे, हे सिद्ध होते.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *