अजितदादांचे आमदारांवर बारीक लक्ष ,पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर करणार कारवाई
Ajit Dada will pay close attention to MLAs, take action against those who break party discipline

अजितदादांसोबत गेलेले आमदार निधीवाटप झाल्यानंतर परत येतील, सर्वच आमदारांना पक्षबंदी नसल्याचं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केल्यानंतर आता त्यावर अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.
शरद पवारांचं हे वक्तव्य केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी आहे, आमच्या आमदारांवर बारीक लक्ष असून पक्षशिस्त मोडणाऱ्यावर कारवाई करणार असल्याचं अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
अजित पवारांसोबत गेलेल्यापैकी सर्वांनाच आपल्या पक्षात प्रवेशबंदी नसल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं. अजित पवार गटातील अनेक आमदार लवकरच आपल्यासोबत येणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिलेत. यावर अजित पवार गटानं प्रतुत्तर दिलंय.
शरद पवारांचं हे वक्तव्य फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. अजित पवारांसोबतचं कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नसल्याने त्यांनी
आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचं मिटकरी म्हणाले. आमच्या आमदारांवर आमचं बारीक लक्ष असून कुणी पक्षशिस्त मोडायचा प्रयत्न केला तर पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, अमोल मिटकरींना आवरा असा सल्ला अजित पवारांना देणाऱ्या भाजप नेते प्रविण दरेकरांवर अमोल मिटकरींनी जोरदार प्रतिहल्ला केला. दरेकरांनीच आपलं तोंड आवरावं,
माध्यमांचे कॅमेरे दिसले की दरेकर प्रसिद्धीसाठी असं बोलतात असा टोला मिटकरींनी त्यांना लगावला. अजित पवारांवर भाजपचं कुणी बोललं
तर आमच्या तोंडाचा पट्टा आणखी वेगाने चालेल असा इशाराही मिटकरींनी दिला. युती धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीनेच घ्यायचा का? असा सवाल मिटकरींनी दरेकरांना केला.