नवाब मलिक यांच्या जामीनावर आज फैसला
Verdict on Nawab Malik's land today
आज विधान परिषद निवडणुकीचे मतदान सुरु आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येक पक्षाची मतांची जुळवाजुळव सुरू आहे.
अशातच क्रॉस व्होटिंग, घोडेबाजाराच्या चर्चांचाही धुरळा सध्या राज्याच्या राजकारणात उडाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नवाब मलिक यांचा आज जामिनाचा शेवटचा दिवस आहे.
पुन्हा आणखी मुदतवाढ मिळण्यासाठी नवाब मलिक यांच्याकडून सुप्रीम कोर्टाकडे अर्ज करण्यात आला आहे. मात्र, आज सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ न मिळाल्यास त्यांना पुन्हा जेलमध्ये जावं लागणार आहे.
न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपिठापुढे सुनावणी पार पडणार असून कोर्ट नंबर 14 मध्ये आज 61 व्या नंबर वर सुनावणी आहे. अशातच नवाब मलिक आज विधान परिषदेसाठी मतदान करणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवाब मलिक यांना ईडीनं 2022 मध्ये गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते.
नंतर ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगातून बाहेर आले होते. प्रकृतीचे कारण देत जामीन मिळावा अशी मागणी तेव्हा त्यांनी केली होती.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान मलिक चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आरोपी होता.
मात्र एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे मलिक तेव्हा चर्चेचा विषय ठरले होते.
नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंड प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली होती. नवाब मलिक तरुंगात असताना राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडल्या.
त्यापैकी एक मोठी घडामोड म्हणजे, नवाब मलिक ज्या पक्षाचा हिस्सा होता. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट. अजित दादांनी वेगळा निर्णय घेतला
आणि भाजपच्या साथीनं महायुतीत सहभागी झाले. तेव्हापासूनच राष्ट्रवादी दोन गटांत विभागली गेली. एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष
आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट). नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटांत विभागलेली होती.
त्यामुळे ते कोणत्या गटात सामील होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. सुरुवातीला त्यांनी तटस्थ भूमिका घेतली. नंतर मात्र त्यांनी अजित पवार गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला.
मात्र, महायुतीतील नेत्यांनी नवाब मलिकांना जोरदार विरोध केला. यामध्ये प्रामुख्यानं भाजप नेत्यांचा सहभाग होता. त्यामुळे नवाब मलिक नेमके कोणाचे? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला.