पुण्यासह राज्याभरात पुरस्थिती, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना
Flood situation across the state including Pune, Deputy Chief Minister Ajit Pawar left for Pune

पुणे शहर परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज मुसळदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला, पिंपरी चिंचवड परिसरात
अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत.
शहराच्या सखल भागात पाणी साचून ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. एनडीआरएफकडून मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
अशात खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली होती. आता शहरातील परिस्थिती लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व
इतर अस्थापनांना सुटी देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. शासकीय कार्यालये वगळता इतरांनी कामकाज बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आवाहन करण्यात आले आहे.
कण्हेर, वीर धरणातून विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
साताऱ्यात मुसळधार पाऊस सुरु असून कण्हेर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.
कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर वीर धरणातून 13 हजार 900 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील पुरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना
मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून राज्यातील अतिवृष्टी आणि मदतकार्याचा आढावा घेतल्यानंतर
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्याकडे रवाना झाले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्वं करणार आहेत.
ताथवडे परिसरात घरात पाणी शिरलं, अद्याप पाऊस सुरूच
पुणे शहर परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अद्याप पाऊस सुरूच आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ताथवडे परिसरात अनेक घरात पाणी शिरलं आहे.अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे.
पिंपरी चिंचवडच्या घरकुल सोसायट्यांमध्ये शिरलं पाणी
पिंपरी चिंचवडच्या घरकुल सोसायटीत चहू बाजूनी पाणीचं पाणी झालं आहे. या सोसायटीतील 165 इमारतींपैकी 25 इमारतीच्या आवारात पाणी शिरले आहे. त्यामुळं इथले नागरिक रात्रभर झोपलेले नाहीत. गेल्या दहा वर्षांपासून इथं हीच परिस्थिती उद्भवते.
रस्त्यांची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपली, खडकवासला धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस; अजितदादांनी सांगितलं पुण्यातील जलप्रलयाचं कारण
पुण्यात पुढेही पाऊस राहणार आहे. मी तातडीने पुण्याला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट केलं आहे. एकता नगरमध्ये स्वत: आयुक्त पोहचले आहेत, असं अजित पवारांनी सांगितले.
जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते. आत्ता जमीन सगळी गेले दोन-तीन दिवसाच्या पावसामुळे ओली आहे.
पुण्यात पेव्हर ब्लॉक आणि सिमेट काॅक्रीट रस्ते आहे. पुण्यात सकाळी धरणातून पाणी सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सगळीकडे पाऊस असल्याने नदी ओव्हरफ्लो झाली असल्याने सकल भागात पाणी साचलेले आहे, असं अजित पवारांनी सांगितले.
खडकवासला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी; पाणी ओसरायला सुरुवात
खडकवासला धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करुन पंधरा हजार क्युसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.
मात्र हे पाणी कमी होणं तात्पुरतं ठरु शकतं. कारण पावसाचा जोर पाहता पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे या संधीचा उपयोग करून सखल भागातील लोकांनी घरातून बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी येण्याची गरज आहे.
सर्वांनी फिल्डवर उतरा, वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा; एकनाथ शिंदेंचे आदेश
पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे.
मावळ मधील कुंडमळा येथे पर्यटकांना बंदी, पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ
मावळ तालुक्यात काल पासून तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथे असणारी इंद्रायणी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.
त्यामुळे पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमळा येथे पाणी साकव पुलापर्यंत आले आहे. कुंडमळा परिसरात असणाऱ्या कुंडदेवी मातेचे मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे.
कुंडमळा परीसरात वर्षाविहार करण्यासाठी अनेक पर्यटक येतात. मात्र कुंडमळा येथे पाण्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांना येथे बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात शिरलं पाणी
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात पाणी शिरलं आहे. पुण्यातील शनिवार पेठेत असलेल्या महादेवाच्या मंदिरात पाणी शिरलं आहे.
पुणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंदिरात पाणी गेलं आहे. मंदिराच्या शेजारी असलेल्या मुठा नदीत खडकवासला धरणाच्या पाण्याचा विसर्ग होतो आहे. सकाळच्या सत्रात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.






