महायुतीचे दिल्लीत आज रात्री जागा वाटप ; अमित शाहांसोबत शिंदे, फडणवीस आणि दादांची खलबतं
Allotment of Grand Alliance seats in Delhi tonight; Shinde, Fadnavis and Dada are in trouble with Amit Shah
राज्यातील तीन प्रमुख नेते आज दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही महायुतीचे नेते दिल्लीत आहेत
या तिन्ही नेत्यांची आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांच्याशी चर्चा होणार आहे. शाह यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार असून
यावेळी जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे दिल्लीत आज रात्रीच जागा वाटपाच्या
फॉर्म्युल्याबाबतचा फुल्ल अँड फायनल निर्णय होण्याची शक्यता असून राजकीय निरीक्षकांचं दिल्लीतील या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
आज नियोजन आयोगाची बैठक होती. या बैठकीसाठी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही दिल्लीत पोहोचत आहेत.
संध्याकाळी भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शाह यांची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी फडणवीस दिल्लीत आले आहेत.
त्यानंतर रात्री उशिरा अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकांची रणनीती आणि जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणारा आहे. महायुतीचे तिन्ही बडे नेते दिल्लीत असणार आहेत. आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील अडथळे दूर केले जाणार आहेत. या बैठकीत जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार आहे.
कुणाला किती जागा द्यायच्या याचा फॉर्म्युला या बैठकीत ठरवला जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजितदादा गटाला आणि शिंदे गटाला प्रत्येकी 80 हून अधिक जागा हव्या आहेत. त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमित शाह यांच्यापुढे आपली ही मागणी ठेवतात का?
त्यावर अमित शाह काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपकडे सध्या 104 आमदार आहेत. अपक्षांची संख्या मिळून हा आकडा मोठा होतो.
त्यामुळे भाजपही अधिकाधिक जागा घेऊन विधानसभा निवडणुकीत डाव टाकण्याच्या तयारीत आहे. अशावेळी शिंदे गट आणि
अजितदादा गटाने 80 हून अधिक जागांचा हट्ट धरल्यास भाजपची कोंडी होऊ शकते. त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होईल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.