४८ तासांत माफी मागा अन्यथा… राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्याला इशारा
Apologize within 48 hours or else... Warning to NCP state spokesperson
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे.
सूरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर टीका केली होती. त्याला आक्षेप घेत दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चव्हाण यांनी नोटीस मिळाल्यापासून पुढील ४८ तासांत माफी मागावी
अन्यथा त्यांच्यावर दिवाणी तसेच फौजदारी स्वरुपात कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, चव्हाण यांनी या नोटीशीवर प्रतिक्रिया देताना, त्याला कायदेशीर उत्तर देण्यात येईल, असे स्पष्ट केले.
पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन अपघातावर भाष्य करताना अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना लक्ष्य केले होते.
त्यानंतर दमानिया यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या जन सन्मान यात्रेवर टीका करताना जनतेचा पैसा का खर्च केला जात आहे, असा प्रश्न एक्सवर पोस्ट करत केला होता.
त्याला उत्तर देताना पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी वैयक्तिक टीका केली होती. तसेच गेल्या काही वर्षांत तुम्ही स्वखर्चाने कितीवेळा परदेशी दौऱ्याला गेल्या आहात,
असा प्रश्नही केला होता. रिजार्चवर चालणाऱ्या बाई म्हणून सूरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर शेरेबाजी केली होती. सूरज चव्हाण
यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीवर हरकत नोंदवत दमानिया यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवल्याचे बुधवारी एक्सवर पोस्ट केले.
नोटीस मिळाल्यापासून पुढील ४८ तासात प्रसारमाध्यमांवर जाहीर माफी मागावी अन्यथा तुमच्यावर दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल
असा इशारा दमानिया यांनी कायदेशीर नोटीशीत दिला आहे. दरम्यान या नोटीशीला कायद्याच्या माध्यमातूनच उत्तर देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिली.