मनोज जरांगेचा नवा प्लॅन ;मराठा समाजाला आवाहन “कुणाच्याही सभेला जाऊ नका”
Manoj Jarange's new plan: appeal to Maratha community, don't go to anyone's meeting

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. मनोज जरांगे पाटील हे राजकीय नेत्यांची गोची करणार असल्याचं चित्र आहे.
कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका, असं आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची गोची होणार असल्याचं चित्र आहे.
मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली होती. आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठिण होणार आहे.
मनोज जरांगे पाटील हे बीडच्या बेलगाव येथे होते. यावेळी त्यांनी बोलताना हा इशारा दिला आहे. माझं आमरण उपोषण 17 तारखेपासून सुरू होणार आहे.
उपोषणापूर्वी आराम आवश्यक असतो म्हणून उद्यापासून कुठेही कार्यक्रमाला जाणार नाही. मी मुद्दाम आमरण उपोषण करत नाही.
माझा मायबाप समाज आरक्षणाची आशेने वाट पाहत आहे. समाज म्हणतो आमच्या लेकरांची शेवटची आशा तुम्ही आहात. सरकार
आरक्षण देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी लढावे लागणार आहे. माझा जीव गेला तरी हरकत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आरक्षण मिळालं तर ते सूर्य चंद्र असेपर्यंत राहील. आरक्षण हा आपला हक्क आहे. राजकीय लोकांना डोळ्यासमोर ठेऊ नका.
समाजाच्या लेकरांसाठी मी जीवाची बाजी लावत आहे. आरक्षण मिळाल्यावर माझा समाज मोठा होणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आपल्या विरोधात राज्यभर आंदोलन उभे राहत आहेत. आपल्यात फूट पाडली जात आहेत, भावनिक होऊ नका. आता 1500 रुपये दिल्याने तुमचं आयुष्य मार्गी लागणार नाही.
ते आपले पैसे आहेत. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वावर विकले नाही. या सरकारने लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले. मग भाच्याचे काय? त्याला आरक्षण पाहिजे
आणि दाजीचा काम करून तोंडाला फेस आला. त्याच्या मालाला भाव पाहिजे. आता दाजीला घेऊन मुंबईला जातो, मामाला ( मुख्यमंत्री ) दाजीचा कचका माहीत नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.
आरक्षणाची किंमत तुमच्या लेकरांना माहीत आहे. खूप दिवसांनी माझा समाज एक झाला आहे. पक्ष आणि राजकारण्यासाठी फूट पडू देऊ नका.
माझ्या विरोधात सरकार ट्रॅप रचत आहे. त्यात सरकारमधील आमदार आणि मंत्री आहेत, असे करणाऱ्याला खुर्चीवर बसू देऊ नका. मी पाडा म्हटलो तरी, 32 जण पडले, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रमध्ये मणिपूर होणार आहे. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. पण तुम्ही शांत रहा आणि सावध रहा. त्रास देणाऱ्याला गपागप पडायचे आहे.
मी एका एका काठीचा हिशोब घेणार आहे ( अंतरवाली मधील लाठीचार्ज) कितीही त्रास झाला तरी हटायचे आणि मतदान केंद्रावर दाखवून द्यायचे आहे. मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचे नाही, असं आवाहनही त्यांनी केलं.