आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात?
Another Thackeray in the election field?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनाची स्थापना केली. त्यावेळी शिवसेना समाजकारणात होती. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे सूत्र होते.
त्यानंतर शिवसेनेची वाटचाल हळूहळू राजकारणाकडे होऊ लागली. मग शिवसेनेच्या राजकारणाची सूत्र बाळासाहेब ठाकरे सांभाळू लागले.
शिवसेना प्रमुखांनी स्वत: कधी निवडणूक लढवली नाही. परंतु सत्तेच्या रिमोट त्यांच्याकडेच राहिला. शिवसेनेत उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या माध्यमातून थेट राजकारणात आले.
परंतु ते निवडणुकीच्या मैदानात उतरले नाही. मात्र, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांनी २०१९ मध्ये मैदान मारले.
त्यानंतर ठाकरे घराण्यातील आणखी एक युवा नेता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्या नेत्याने स्वत: बैठकीत आपली इच्छा व्यक्त केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राजगडवर बैठक झाली. या बैठकीत मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी स्वत: निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.
तसेच कोण कोणते नेते निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत, त्याची विचारणा त्यांनी केली. पक्षातील सर्वच नेत्यांना निवडणूक मैदानात उतरण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
ठाकरे घराण्यातील अनेक जण आता सक्रीय राजकारणात आहेत. परंतु थेट निवडणूक आतापर्यंत केवळ आदित्य ठाकरे उतरले. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत वरळी मतदार संघामधून ते निवडून आले.
त्यानंतरत अडीच वर्षे ते मंत्री राहिले. त्यांच्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आता अमित ठाकरे यांनी व्यक्त केली.
अमित ठाकरे कोणता मतदार संघ निवडणार? हे अद्याप त्यांनी सांगितले नाही. त्यांनी कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांनी आतापर्यंत पक्षाचे तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात बाळा नांदगावकर (शिवडी), दिलीप धोत्रे (पंढरपूर), राजू उंबरकर (लातूर ग्रामीण-विदर्भ) यांचा समावेश आहे.
एकूण २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता मनसेचे आणखी कोण कोणते नेते निवडणुकीच्या मैदानात उतरणार?
हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. रविवारी पुन्हा मनसेची बैठक होणार आहे. त्या बैठकीत कोण कोणते नेते निवडणुकीच्या मैदानात उतरणार, त्याचा अहवाल मांडणार आहे.
दरम्यान, अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यावर शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काय भूमिका घेणार?
त्याकडे लक्ष लागले आहे. तसेच २०१९ मध्ये आदित्य ठाकरे विरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, त्याकडे लक्ष असणार आहे.