महायुती,आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय भूकंप होणार,नेत्याचा खळबळजनक दावा
There will be a political earthquake in Mahayuti and Mahavikas Aghadi, the sensational claim of the leader
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केलीय. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच
प्रकाश आंबेडकरांनी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट केलाय. महायुती आणि मविआच्या पक्षांमध्ये भूकंप होईल असा गौप्यस्फोट आंबेडकरांनी केला.
विधानसभा निवडणूका तोंडावर आल्यानं जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही भाजप 150 हून अधिक जागा लढण्यावर ठाम आहे.
तर शिंदेंच्या शिवसेनेनं लोकसभेतील स्ट्राईक रेटचा आधार घेत 120 ते 128 जागांवर दावा केलाय. तर अजितदादांचा गटानंही 70 जागांवर दावा केलाय.
अजित पवारांना 50 ते 60 पेक्षा अधिक जागा देण्यास भाजपचा विरोध असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे अजित पवार महायुतीतून
बाहेर पडून स्वतंत्रपणे लढण्याची शक्यताही वर्तवली जातेय. त्यामुळे महायुतीत सारेच काही आलबेल नसल्याचं चित्र आहे.
तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावरून संघर्ष सुरू आहे. काँग्रेस 150 जागांच्या खाली यायला तयार नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस 88 जागांच्या खाली यायला तयार नाही.
त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेना फक्त 44 जागा मिळतील. त्यामुळे मविआतील जागावाटपावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर सर्वात मोठा पेच असणार आहे,
असंही आंबेडकर यांनी दावा केलाय. उद्धव ठाकरेंसाठी आम्ही दरवाजे बंद केलेले नाहीत. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर चर्चा करु असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलाय. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा महायुतीला मोठा फटका बसलाय तर महाविकास आघाडीला फायदा झालाय.
त्यामुळे महाराष्ट्रात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचं वक्तव्य केल्यानं राजकीय खळबळ माजलीय.