काँग्रेसमध्ये नेते इच्छुकांच्या छुप्या बैठका

Secret meetings of Congress aspirants

 

 

 

महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. अनेक जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झालेले नसल्याने चर्चेचे गुऱ्हाळ कायम आहे.

 

जागावाटपाचे सूत्र कायम झालेले नसूनही महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी छुप्या बैठकांचे सत्र सुरू केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

 

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रिपदाबरोबर मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसमधील सर्वच बडे नेते या बैठकांमध्ये सध्या व्यग्र असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली.

 

याशिवाय या बैठकींमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधून त्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न काँग्रेसमधील पक्षश्रेष्ठींकडून सुरू असल्याची माहिती अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना दिली.

 

महाविकास आघाडीला मुख्यत: काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण असून विधानसभेत जास्तीत जास्त जागा पक्षाने लढव्यावात यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

 

यासाठी जागावाटपाच्या चर्चेतही काँग्रेस जास्तीत जास्त जागांसाठी दावा करीत आहे. त्यातच महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांपासून इच्छुक उमेदवारांची चाचपणी पूर्ण करीत

 

एक यादी जवळपास निश्चित केली आहे. लवकरच या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असून त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा मानस आहे.

 

दुसरीकडे, या इच्छुक उमेदवारांना आपल्याकडे वळविण्यासाठी पक्षांतंर्गत बैठकांचा जोर वाढल्याची माहितीही सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी

 

त्यांच्या समर्थकांच्या बैठकांचे आयोजन करीत निवडणुक कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच प्रथम फळीतील अनेक नेते मंडळींकडून इच्छुक उमेदवारांची वैयक्तिक भेटसुद्धा घेतली जात आहे.

 

या भेटीत निवडणुकीसाठी तयारीला लागण्याची सूचना देतानाच निवडणुकीनंतरच्या रणनीतीवरही चर्चा केली जात असल्याची माहिती काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *