Exit Polls वर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Rahul Gandhi's first reaction on Exit Polls

लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यांचं मतदान शनिवारी, 1 जून 2024 रोजी पूर्ण झालं. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेल्या निकालपूर्व एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली.
विविध संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए तिसऱ्यांदा सत्तेवर येणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया’ आघाडीचं सत्तेचं स्वप्न यंदाही अपूर्णच राहणार असल्याची शक्यता आहे. केवळ देशातच नाही
तर जगभरामध्ये जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील निवडणूक पूर्व अंदाजांची आकडेवारी मांडणाऱ्या एक्झिट पोलची चर्चा असतानाच
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी 350 चा आकडा पार करेल असा अंदाज व्यक्त करणारे एक्झिट पोल फेटाळले आहेत.
एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर राहुल गांधींनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाच्याबाहेर त्यांनी पत्रकारांना अगदी मोजक्या शब्दात एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली.
“या सर्वेक्षणांचं नाव एक्झिट पोल नसून हे ‘मोदी मिडीया पोल’ आहेत. हे मोदीजींचे फॅण्टसी पोल आहेत,” असं राहुल गांधींनी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना म्हटलं.
त्यानंतर राहुल गांधी काँग्रेस कार्यालयाकडे चालू लागले. मात्र एका पत्रकाराने ‘तुमच्या हिशोबाने किती जागा मिळतील?’ असा प्रश्न कॅमेराकडे पाठ करुन जात असलेल्या राहुल गांधींना विचारला. राहुल गांधी हा प्रश्न ऐकून मागे वळाले
आणि प्रसारमाध्यमांच्या माईक्ससमोर येऊन पुढे बोलताना राहुल गांधींनी, “तुम्ही सिद्धू मुसेवालाचं 295 गाणं ऐकलं आङे का? आम्हाला 295 जगा मिळतील,”
असं म्हणून राहुल गांधी कार्यालयात निघून गेले. काँग्रेसच्या मुख्य नेत्यांची बैठक आज पार पडत असून त्यानिमित्तानेच राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयामध्ये आले होते.
दरम्यान, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर सोशल मीडियावरुन शनिवारीच पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
आपल्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन मोदींनी, “मी पूर्ण आत्मविश्वासने सांगू इच्छितो की मतदारांनी विक्रमी संख्येने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची पाठराखण केली आहे.
विरोधकांना जनतेनं पूर्णपणे नाकारले असून त्यांचा प्रचार केवळ मोदी द्वेषावर अवलंबून होता. ज्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मतदान केलं त्यांचे मी आभार मानतो,” असं म्हटलं आहे.
कालच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनीही एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानंतर ती फेटाळून लावत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे.