काका पवार – पुतण्या अजित पवार सह अख्खी राष्ट्रवादी उद्या पहिल्यांदाच एकाच मंचावर
Uncle Pawar - nephew Ajit Pawar and the entire nationalist party will be on the same platform for the first time tomorrow

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात वितुष्ट आलं होतं. पवार कुटुंबातील काही सदस्यांनी तर एकमेकांच्या विरोधातही निवडणुका लढवल्या होत्या. यावरून पवार कुटुंबात काहीच अलबेल नसल्याचं बोललं जात होतं.
पण त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या बैठका आणि काही कामानिमित्ताने बैठका होत गेल्या. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांची मध्यंतरी भेट घेतली होती.
त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीतील दुरावा काहीसा दूर झाल्याचं सांगितलं जात होतं. आता तर उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अख्खी राष्ट्रवादीच एका मंचावर येणार आहे. पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्व नेते एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे.
शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी यांचं नुकतंच निधन झालं आहे. शरद पवार यांना सुरुवातीपासूनच धुवाळी यांनी साथ दिली होती. धुवाळी यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून शोक व्यक्त केला गेला.
धुवाळी यांचे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. धुवाळी यांचं निधन झाल्याने त्यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत वाय. बी. सेंटर येथे ही शोकसभा पार पडणार आहे.
या शोकसभेच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहेत. सोबतच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल,
सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर दिसणार आहेत.
तुकाराम धुवाळी हे शरद पवार यांचे अत्यंत जुने सहकारी आणि स्वीय सहायक होते. शरद पवार हे गेल्या 60 वर्षापासून राजकारणात आहेत. तर धुवाळी यांनी 1977 पासून म्हणेज पवार यांना 53 वर्ष साथ दिली आहे.
अखेरच्या श्वासापर्यंत धुवाळी हे शरद पवार यांची सावली बनून राहिले होते. त्यामुळेच त्यांचे पवार कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंधही झाले होते. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू, प्रामाणिक, सचोटीने वागणारा आणि अत्यंत निगर्वी व्यक्ती म्हणून धुवाळी यांची ओळख होती.