जिंतूर-75.36%,परभणी- 65.73%, गंगाखेड – 73.04%तर पाथरी विधानसभेत 70.97टक्के मतदान
Jintur-75.36%, Parbhani-65.73%, Gangakhed-73.04%, Pathri Assembly polls saw 70.97% voting.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.
जिल्ह्यात 71.45 टक्के मतदान झाले. मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
तर निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली असून सुरक्षित व निर्भय वातावरणात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीसाठी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलते होते. अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी मतदानाची टक्केवारी वाढल्याबद्दल समाधान व्यक्त करत मतदानाच्या एकूण टक्केवारीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड व पाथरी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेली मतदान टक्केवारी याप्रमाणे- जिंतूर-75.36 टक्के, परभणी- 65.73 टक्के, गंगाखेड – 73.04 टक्के आणि पाथरी- 70.97 टक्के असे एकूण सरासरी 71.45 टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. जिंतूर- पुरुष-154418, स्त्री-138209, इतर-7. परभणी- पुरुष-120174, स्त्री-110243, इतर-7. गंगाखेड- पुरुष-162086, स्त्री-145597, इतर-0. पाथरी – पुरुष-147146, स्त्री-131958, इतर-0. असे एकूण पुरुष-583824, स्त्री-526007, इतर-14 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतमोजणी ही शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्रांचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत. 95-जिंतूर-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, जिंतूर
96-परभणी-कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी, 97-गंगाखेड-संत जनाबाई महाविद्यालय, कोद्री रोड, गंगाखेड आणि 98-पाथरी-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, पाथरी येथे होणार आहे.
मतमोजणीच्या तयारीबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मतमोजणीसाठी नेमण्यात आलेले मतमोजणी पर्यवेक्षक, सहायक कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षक यांचे रॅडमायजेशन करण्यात येवून विधानसभानिहाय कर्मचारी यांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत.
मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणि कोणतीही इलेक्ट्रॉनीक वस्तू आणण्यास परवानगी नाही. मतमोजणी परीसरात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुरविलेल्या पासेस किंवा भारत निवडणूक आयोगाकडील पासेस असल्याशिवाय प्रवेश नाही.
कार्यालयीन किंवा नेहमीच्या ओळखपत्रावर प्रवेश नाही. ईव्हीएमची मतमोजणी 14 टेबलवर होईल. व्हीव्हीपॅट पेपर स्लिप मतमोजणी ही सर्व ईव्हीएम (सीयु) ची मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासाठी ड्रॉ पध्दतीने निवडलेल्या 5 मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅट पेपर स्लिपची मोजणी एका टेबलवर क्रमाने होईल.
मतमोजणी कक्षात निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरीक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सुक्ष्म निरीक्षक, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी यांना प्रवेश असेल.
सकाळी 5.00 वाजता मतमोजणी कर्मचा-यांचे रॅन्डमायझेशन होणार आहे. सर्व कर्मचारी यांना सकाळी 5.00 वाजता हजर राहणेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुचित केले आहे.
स्ट्रॉग रूम सकाळी 7.00 वाजता उघडताना उमेदवार अथवा निवडणूक प्रतिनीधी यांनी उपस्थित रहावे. मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल अथवा ईलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगता येणार नाही. सर्व मतमोजणी प्रतिनिर्धीनी पासेससह हजर राहता येणार आहे. विधानसभा मतदारसंघ आणि नेमून दिलेला टेबल सोडून मतमोजणी प्रतिनिधीयांना इतरत्र जाता येणार नाही.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी निवडणूक काळात पोलीस विभागाने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांबाबत माहिती दिली. निवडणूक काळात 10 गुन्हे दाखल करण्यात आले.
यामध्ये आचारसंहिताभंगाच्या 3 तर इतर 7 दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे. रुपये 99 लक्ष 68 हजार इतकी रोख जप्त करण्यात आली. रुपये 54 लक्ष 58 हजाराची दारु जप्त करण्यात आली.
1 लाख रुपयाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 23 नोव्हेंबर रोजी होणारी मतमोजणी शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.