पवारांचा शिलेदार पुन्हा भाजपच्या वाटेवर ?
Pawar's shilledar again on the way to BJP?

मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतोय नव्हे, तर मी बांधलेलं ते घर आहे. मी माझ्या घरात परत जातोय,जाण्याचा दिवस आपण
जाहिरपणे कळविणार आहोत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसीबाबत मत व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षात जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. त्याबाबत संकेतही मिळत होते.
मात्र शनिवारी एकनाथ खडसे यांनी आपल्या घरवापसीवर शिक्कामोर्तब केले आहे. मुंबई येथे त्यांनी ही घोषणा केली आहे. मात्र ते घरवापसी केंव्हा करणार याबाबत मात्र त्यांनी तारीख जाहीर केलेली नाही.
एकनाथ खडसे म्हणाले, होय मी भारतीय जनता पक्षात घरवापसी करणार आहे.
मात्र आज नव्हे तर लवकरच आपण तो करणार आहोत. भारतीय जनता पक्षात मी प्रवेश करतोय म्हणण्यापेक्षा मी माझ्या घरी जातोय आहे.
भारतीय जनता पक्ष हे माझं घर आहे, मी ते बांधल आहे, त्यासाठी आपण प्रयत्न केले त्यातून ते उभं राहिलं आहे. मुलांच्या नाराजीमुळे वडिलांना घराबाहेर काढलं जात
आणि वडिलांनाही नाईलाजास्तव जावं लागत त्या प्रमाणे आपल्यावरही नाराजी होती त्यामुळे आपल्याला घराबाहेर काढलं गेले त्यामुळे आपणही घराबाहेर पडलो.
परंतु आपण आता पुन्हा आपण आपल्या घरी जाणार आहोत हे निश्चित आहे. लवकरच आपण आपल्या घरी जाणार असून त्याबाबतची घोषणा आपण जाहीर करणार आहोत.
भारतीय जनता पक्षातर्फे एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली
त्यावेळेस खडसे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. खडसे गेल्या काही दिवसापूर्वी दिल्ली येथे गेले होते,
त्यावेळी ते पक्षाच्या वरिष्ठांना भेटल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यांचा त्यांनी इन्कार करीत आपण केवळ न्यायालयीन कामासाठी गेलो असल्याचे सांगितले होते. आपण कोणत्याही भाजपच्या नेत्यांना भेटलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.