भाजपचा आदेश;,मतदारयादीतून नावे वगळा ; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
BJP's order;,Exclude names from voter list; A serious allegation of Mahavikas Aghadi

राज्यामध्ये महाविकास आघाडीला मतदारसंघातून सात नंबरचा फॉर्म वापरून पाच ते दहा हजार नावे कमी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
आज (18 ऑक्टोबर) महाविकास आघाडीने यासंदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेणार असल्याचे सांगत निवडणुकीमधील हेरगिरी लज्जास्पद असल्याचे म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, अंबादास दानवे, शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगासह महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
मतदार यादीमधून नावे गहाळ होण्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट हात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा नाना पटोले यांनी केला.
हिंमत असेल तर समोरून लढा, भाजपचा रडीचा डाव करून जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी श्रीमती किरण गाडेकर (सरपंच गाव तेलाना, ता. चिखली, जि.बुलढाणा) यांचा या संदर्भातील व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर केला.
गाडेकर यांनी मतदारयादीतून चुकीच्या पद्धतीने नावे कमी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फाॅर्म 7 नंबरसह योजनादूतांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी आयोगाकडे करणार असल्याचे म्हटले आहे.
नाना पटोले म्हणाले की, या सर्व षड्यंत्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सामील आहेत. महायुती हरत असल्याने ते रडीचा डाव खेळत आहेत.
दम असेल तर समोरासमोर लढा सर्व मतदार यादी तपासा. असं करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. योजनादूतच्या नावाखाली 50 हजार दिले गेले.
ही भाजप संघाची लोक आहेत. निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की योजनादूत बंद करावेत. फॉर्म 7 च्या माध्यमातून खोटे अर्ज केले जात आहेत.
मविआ विचारांचे लोक यादीतून कमी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या सगळ्या षड्यंत्रामागे फडणवीस व एकनाथ शिंदे आहेत. चिखली मतदारसंघात दोन हजारांहून अधिक मतदार कमी केले गेले आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीला अधिकची मत मिळाली आहेत त्या ठिकाणी 10 ते 20 हजार मत कमी करण्याचा प्रयत्न आहे.
सात नंबरचा फाॅर्म रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर फोटो वेगळा व नाव वेगळे आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की फॉर्म नंबर 7 ऑनलाईन भरण्याची पद्धत चुकीची आहे. याद्वारे प्रत्येक मतदारसंघातून पाच हजार नावे कमी करण्याचा डाव आहे.
सिन्नरमध्ये अशी 5 हजार नावे वगळली, पण आक्षेप घेतल्यावर परत आली. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करत आहे.
मतदार यादी चुकीची छापली गेली आहे. निवडणूक पद्धतच संशयास्पद आहे. एकाच घरातील पाच नावे वेगवेगळ्या केंद्रावर आहेत.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर 122 शासन निर्णय काढले, अनेक टेंडर काढले सोबतच अनेक नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून हे सर्व रद्द झालं पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
खासदार अनिल देसाई म्हणाले की, मतदार यादीतून नावं कमी होणं हे खूप धक्कादायक आहे. पारदर्शकता दिसत नाही. आमचे शिष्टमंडळ भेटून तक्रार करणार आहोत.
मतदारांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. घरून मतदान करण्याचा जो अधिकार आहे. त्याच्यात पारदर्शकता असायला हवी. मतदार प्रतिनिधींना घेतल्याशिवाय त्यांच्या घरी जावू नये. मुंबईत प्रत्येक मतदारसंघात साडेचार हजार असे मतदान आहे.