मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग,असा ठरला फॉर्म्युला;इच्छुकांच्या हृदयाचे ठोके वाढले !
Intense lobbying for ministerial posts, this is the formula

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन दिवसात होणार आहे. हिवाळी अधिवेशनातच रविवारी नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे आपल्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी म्हणून इच्छुकांची जोरदार लॉबिंग, सेटिंग, फिल्डिंग सुरू झाली आहे. खासकरून मंत्रिपदासाठी शिंदे गटात मोठी लॉबिंग सुरू आहे
. पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत हे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. कुणाला मंत्रिपदं द्यायची आणि कुणाला नाही याची चर्चा या बैठकीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी फडणवीस सरकारचा विस्तार होणार आहे. या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाट आणि उदय सामंत
हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले आहेत. मंत्रिमंडळात 13 मंत्र्यांनाच स्थान मिळणार असल्याने कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कुणाला नाही यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्यात 14 महापालिकेच्या निवडणुका होणार आहे, त्यामुळे कोणत्या भागात किती मंत्रिपदं द्यायची, प्रदेशनिहाय मंत्रिपदं द्यायची का?
पक्ष मजबूत करण्यासाठी कोणत्या भागावर जोर द्यावा लागेल याची चर्चाही या बैठकीत करून नंतरच मंत्रिपदाचं वाटप केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रीपदाची आस लावून बसले होते. पण त्यातील फार थोड्यांनाच संधी मिळाली होती.
अजितदादा यांचा महायुतीत प्रवेश झाल्यानंतर शिंदे गटाच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे कमी झाली होती. त्यामुळे शिंदे गटाच्या अनेकांचा हिरमोड झाला होता.
त्यानंतर सरकारच्या अखेरच्या काळात काही आमदारांना महामंडळ देऊन त्यांची समजूत काढण्यात आली होती. मात्र, आता फडणवीस सरकार पाच वर्षासाठी असणार आहे.
त्यामुळे प्रत्येकाला फुल्ल टर्म मंत्रिपद हवं आहे, ज्यांना मागच्यावेळी मंत्रिपद मिळालं नव्हतं ते आता मंत्रिपदासाठी दावा ठोकून बसले आहेत.
त्यामुळे या इच्छुकांची एकनाथ शिंदे कशी समजूत काढतात? किंवा त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकतात का? हे पाहावं लागणार आहे.
फडणवीस सरकार पाच वर्ष राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला मंत्री बनायचं आहे. मात्र इच्छुक जास्त आणि मंत्रिपदं कमी अशी स्थिती झाली आहे.
त्यामुळे अडीच अडीच वर्ष प्रत्येकाला मंत्रिपद देण्याचं शिंदे गटात घटत आहे. हा फॉर्म्युला जर लागू केला तर पहिली अडीच वर्ष आपल्यालाच मिळावी म्हणून इच्छुकांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.
फडणवीस सरकारमध्ये भाजपचे 21, शिंदे गटाचे 13 आणि अजितदादा गटाचे 9 मंत्री असणार आहेत. आमदारांच्या संख्याबळानुसार हा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
तसेच नव्या सरकारमध्ये कुणाकडे कोणती खाती असणार याचंही वाटप करण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे. येत्या रविवारी 15 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर 5 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता येत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे 34 ते 35 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे 23 मंत्री,
शिवसेना शिंदे गटाचे 13 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 9 मंत्री असणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपचे 17 शिवसेनेचे 10 आणि अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच यावेळी गृह आणि अर्थ असे दोनही महत्त्वाची खाती असणार आहेत.
भाजपाचे संभाव्य मंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
प्रवीण दरेकर
मंगलप्रभात लोढा
बबनराव लोणीकर
पंकजा मुंडे
आशिष शेलार किंवा योगेश सागर
संभाजी निलंगेकर
जयकुमार रावल
शिवेंद्रराजे भोसले
नितेश राणे
विजयकुमार गावित
देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर
राहुल कुल
माधुरी मिसाळ
संजय कुटे
गोपीचंद पडळकर
शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
दादा भुसे
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
मंगेश कुडाळकर
अर्जुन खोतकर
भरत गोगावले
संजय शिरसाट
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
प्रताप सरनाईक
प्रकाश सुर्वे
योगेश कदम
बालाजी किणीकर
प्रकाश आबिटकर
दरम्यान रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं नागपुरातही घडमोडींना वेग आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी चाळीस बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.