महायुतीच्या घटकपक्षात टेन्शन ; रिपाइं’चा महायुतीवर बहिष्कार
Tension in Mahayuti's component parties; Ripe's boycott of Grand Alliance

‘विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने महायुतीकडे बारा जागा देण्याची मागणी केली होती. मात्र, मित्रपक्षांना डावलून भाजप, शिवसेना
आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:च्या जागा वाढविल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांत असंतोष असून ‘रिपाइं’ने महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार घातला आहे.
वरिष्ठ नेते रामदास आठवले यांचे आदेश येईपर्यंत बहिष्कार कायम राहील,’ अशी माहिती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक शनिवारी शहर कार्यालयात पार पडली.
या वेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर थोरात, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे,
विजय मगरे, दिलीप पाडमुख, प्रवीण नितनवरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीत घटकपक्ष असल्यामुळे ‘रिपाइं’ला बारा जागा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली होती.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रत्येकी तीन जागा सोडल्या पाहिजेत, असे आठवले यांनी म्हटले होते. मात्र, महायुतीच्या जागा जाहीर झाल्या असून ‘रिपाइं’ला अद्याप एकही जागा सोडलेली नाही.
या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत महायुतीचा निषेध करण्यात आला. ‘शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी स्वत:च्या जागा वाढवून घेतल्या आहेत. मित्रपक्षाला जागा देण्याची भूमिका घेतली नाही.
सत्तेत बसण्यासाठी यांना दलितांची मते हवी आहेत. राज्यात ‘रिपाइं’ची अवहेलना सुरू आहे. कार्यकर्त्यांत असंतोष असून महायुतीचे
काम करणार नसल्याचा ठराव घेतला आहे,’ असे कदम यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात ‘रिपाइं’च्या कार्यकर्त्यांना सन्मानावे वागवले जात नाही. विचारात घेतले जात नाही. शहरात महायुतीचे प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले.
आम्हाला बोलावले नाही. त्यामुळे महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार टाकत असल्याचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी सांगितले. तसेच कुणी पदाधिकारी प्रचारात आढळल्यास पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही कदम यांनी दिला आहे.