सहाशे रुपयांची लाच घेताना महिला अटकेत
Woman arrested for accepting bribe of Rs.600

पाणी पुरवठ्याचे देयक नियमित करून देण्यासाठी एकाकडे लाच मागितल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयातील पाणीमीटर निरीक्षकासह कंत्राटी संगणक चालक (ऑपरेटर)
महिलेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने कारवाई केली. महिलेला सहाशे रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. तर, पाणीपुरवठा निरीक्षक पसार झाला आहे.
पाणी मीटर निरीक्षक विकास सोमा गव्हाणे व कंत्राटी संगणक चालक आशा कानिफनाथ चौपाली यांच्यावर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चौपाली हिला अटक केली असून गव्हाणे पसार आहे.
यातील तक्रारदार यांचे पाणीपट्टी देयक सरासरी काढले जात होते. ते नियमितपणे म्हणजे जितका वापर होईल तितके देयक काढण्यासाठी गव्हाणे याने स्वत:साठी एक हजार,
तर चौपाली यांच्यासाठी सहाशे रुपयांची तक्रारदार यांच्याकडे मागणी केली. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार केली. त्यानुसार, ‘एसीबी’च्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला.
चौपाली हिने तक्रारदार यांच्या पाणीपुरवठ्याचे देयक नियमित करून देण्यासाठी स्वत:साठी सहाशे रुपये तर गव्हाणे यांच्यासाठी एक हजार रुपये अशी एकूण १६०० रुपयांची मागणी केली.
ही रक्कम स्वीकारताना चौपाली हिला पथकाने पकडले. चौपाली हिने गव्हाणे यांना त्यांच्यासाठी तक्रारदाराकडून स्वीकारलेल्या
लाच रकमेबाबत दूरध्वनीवरून विचारले असता गव्हाणे याने त्यांच्यासाठी स्वीकारलेली रक्कम चौपाली यांच्याकडे ठेवण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.