विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी, प्रियंका गांधीचा महाराष्ट्रात तळ

Rahul Gandhi, Priyanka Gandhi's Base in Maharashtra Assembly Elections

 

 

 

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर काँग्रेस आता महाराष्ट्रात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे.

 

राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसने मेगा प्लान तयार केला आहे. या प्लाननुसार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत तळ ठोकणार आहेत.

 

दोन्ही नेते महाराष्ट्रावर सर्वाधिक फोकस करणार असून राज्यात जास्तीत जास्त सभा घेणार आहे. याशिवाय काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांचंही महाराष्ट्रावर लक्ष असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष असणार आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका उडवून देण्यात येणार आहे.

 

राज्यात या दोन्ही नेत्यांच्या 15 ते 20 सभा होणार आहेत. दोन्ही नेते प्रत्येक विभागात सभा घेणार आहेत. सोबतच काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांच्या देखील सभा होणार आहेत. सभांच्या अनुषंगाने राज्यातील नेत्यांनी केंद्राला आज सविस्तर माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसच्या आजच्या बैठकीची माहिती दिली. आज वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या.

 

त्यांच्याशी राज्यातील परिस्थितीबाबतची चर्चा करून सर्व माहिती दिली. आघाडी संदर्भातही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

 

आता 23 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथे जिल्ह्याची बैठक होणार आहे. या बैठकीत आम्ही जिल्हानिहाय आढावा घेणार आहोत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

 

 

 

चंद्रपुरातील वादावरही त्यांनी भाष्य केलं. या वादावर काही चर्चा झाली नाही. हा वाद केवळ गैरसमजातून झालेला आहे. आता आम्ही त्यावर पडदा टाकला आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. भाजप हा पक्ष 55 ते 60च्या पुढे जाणार नाही, असं सर्व्हे सांगत आहे.

 

हे इजा बिजा तिजा सरकार महाराष्ट्राला लुटत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात कमिशन खाणारे हे भाजपचे लोक आहेत. 32 कोटी कोणी खाल्ले

 

याचा शोध घेण्याची, चौकशी करण्याची गरज आहे. हे कमीशनखोर, डाकू, लुटारूंचं सरकार आहे. लुटारूंची टोळी या राज्यावर बसली आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *