RSS आणि भाजप संबंधांवर मोठया नेत्याच्या वक्तव्याने चर्चाना उधाण
A big leader's statement on RSS-BJP relations sparks discussion

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधांबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे.
सुरुवातीला भाजपला संघाची गरज लागायची. आता आम्ही सक्षम झालो आहोत. भाजप स्वत:च्या बळावर चालते. संघ ही वैचारिक आघाडी आहे, अशा शब्दांत नड्डा यांनी भाजप आणि संघाच्या संबंधांवर भाष्य केलं आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालावधीतील संघाचं अस्तित्त्व आणि आताचं अस्तित्त्व यांच्यातल्या फरकाबद्दल नड्डा यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर सुरुवातीला आम्ही अक्षम असू, थोडे कमी असू, संघाची गरज भासायची. आता आम्ही मोठे झाले आहोत, सक्षम आहोत. भाजप स्वत:च्या बळावर चालतो, असं उत्तर नड्डा यांनी दिलं. इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं.
भाजपला आता संघाच्या पाठबळाची गरज नाहीए का, असा थेट सवाल नड्डांना विचारण्यात आला. त्यावर आता पक्ष वाढलेला आहे. प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची, भूमिकांची कल्पना, जाणीव आहे.
संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे गरजेचा प्रश्न नाही. संघ ही वैचारिक आघाडी आहे.
ते वैचारिक भूमिकेनुसार त्यांचं काम करतात. आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो. राजकीय पक्ष हेच करायला हवं, असं नड्डा म्हणाले.
भाजपला संघाकडून कायम सहकार्य मिळत आलं आहे. भाजप वाढवण्यात संघाचं मोठं योगदान आहे. त्यामुळे नड्डा यांनी केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे नड्डा यांनी केलेल्या विधानाचं टायमिंग चर्चेचा विषय ठरत आहे. देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत.
चार टप्प्यातलं मतदान पूर्ण झालं आहे. पाचव्या टप्प्यातलं मतदान अवघ्या काही तासांवर आलं आहे. पाचव्या टप्प्यातील प्रचार आज संपेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर नड्डांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.