पुढील 4 दिवसात राज्यात मुसळधार

Heavy rains in the state in the next 4 days

 

 

राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. मुंबईसह कोकणात आणि विदर्भातील काही भागात चांगला पाऊस कोसळत आहे.

 

दरम्यान, अशातच हवामान विभागानं महत्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात 3 ते 7 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.

 

3 ते 7 जुलैदरम्यान राज्यभर पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

विदर्भातही 3 ते 7 जुलैदरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यान ऑफ-शोअर ट्रफ सक्रिय आहे.

 

वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. ते पुढील दोन दिवसांत अधिक प्रभावी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

 

चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. दुपारनंतर चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.

 

खेडमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूणसह खेड, गुहागर, दापोली भागात जोरदार पाऊस सुरु आहे.

 

नाळिक जिल्ह्यात देखील दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर नाशिकच्या कळवण पश्चिम पट्ट्यात पावसाने आज जोरदार बँटिंग करत सुरुवात केली.

 

आज झालेल्या दमदार पाऊसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर अनेक घराच्या पायरीपर्यंत पावसाचे पाणी शिरलं आहे. पावसामुळे कच्च्या घरच्या भिंती पडण्याची दाट शक्यत निर्माण झाली आहे.

 

दरम्यान, पावसाच्या आगमनाने बळीराजा आनंदला असून पश्चिम पट्ट्यात भात लागवडीसह खरीप पिकांच्या पेरणीला वेग येणार आहे.

 

Related Articles