अजित दादा म्हणाले मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शाळेतही एवढ्या उठाबश्या काढल्या नव्हत्या
Ajit Dada said that Chief Minister Shinde Saheb had not caused so many uprisings even in schools

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचा उल्लेख करत सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत असल्याचं उदाहरण दिलं. जनतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने उठाबश्या काढत आहेत,
असं अजित पवार आपल्या खास शैलीत भाषणात म्हणाले. “किती उठाबशा काढायच्या? सर्व सामान्यांचे सरकार आहे. तुम्ही सांगाल तेव्हा उठणार, पण कितीवेळा उठाबशा काढायला लावता?
शिंदे साहेबांनी शाळेत पण इतक्या वेळा उठाबश्या काढल्या नव्हत्या. पण आता सर्वसामान्यांचं सरकार आहे. मग ऐकावं लागतं. आता आम्ही दिलेल्या योजना, हा चुनावी जुमला नाही.
आता ह्या योजना सुरु ठेवण्यासाठी महायुतीचं सरकार आलं पाहिजे. कुठे चुकत असेल तर तुम्ही पण लक्ष ठेवा. कमी पडले तर आम्ही नक्की देऊ”,
असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी एक प्रेक्षक मध्ये बोलत होता. त्यावर अजित पवारांनी “एवढे सगळे महाभारत सांगितले तरी पुन्हा सांगायचे की काय झाले? रामाची सीता कोण होती. जरा दमादमान घ्या. एकदम दिले की अजीर्ण होते”, असा टोला लगावला.
“मातंग समाजाचे कौतुक करतो की या समाजाने नररत्न राज्याला दिले. अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक घाटकोपर येथील चिरा नगर येथे उभारले जाईल.
या स्मारकाला निधी कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही मी आज देतो. महायुतीचे सरकार सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जात आहे.
सर्व विचारधारा कशी पुढे घेऊन जाता येईल यासाठी आम्ही काम करतोय. जे चांगल झालं त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. हे फेक नरेटिव्ह पसरवत आहेत.
जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान बदलणार नाही. आम्ही बेंबीच्या देठापासून सांगतोय अरे नाही बदलणार तरी लोकांना त्यांचेच खरे वाटले”, अशी खंत अजित पवारांनी यावेळी व्यक्त केली.
“आपण फक्त घोषणा केल्या नाही, तर त्या कृतीत आणल्या. बजेटमध्ये पण फक्त घोषणा केल्या नाही तर त्याची तरतूद केली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मदत करण्याचा प्रयत्न केला. वित्त विभागाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध आहे म्हणून सांगतात.
कोण बोलले? मी वित्त विभागाचा मंत्री आहेत खोट्या बातम्या काही जण देत आहेत”, अशी टीका अजित पवारांनी केली.
“माध्यमांना बातमी देण्याचा अधिकार आहे. पण थोडी खरी माहिती घ्या. मी बोलत नाही मलाच सर्व अक्कल आहे. काम करतो तोच चुकतो. काम करत नाही तो कसा चुकेल?
काम करताना काही चुकले तर आम्ही त्या चूक दुरुस्ती करू. पण त्यासाठी तुम्ही त्याची नोंद घ्यावी. मागच्या निवडणुकीत काय झाले त्याच्या खोलात जात नाही.
पण यापुढे खरं काय, हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मातंग समाज कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. केवळ संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे”, असं अजित पवार म्हणाले.
“लाडकी बहीण योजना सुरुच राहणार. हा चुनावी जुमला नाही. आम्ही शब्दांचे पक्के आहोत. विरोधक काय बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.
महायुतीचे सरकार आले तर योजना सुरु राहणार. चुकीची माणसे आली तर योजना बंद होते”, असं म्हणत अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलं.