दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Eknath Shinde attacked Uddhav Thackeray from Dussehra gathering

शिवसेना फुटून दोन गट पडल्यानंतर हे दोन्ही गट मुंबईतील दोन वेगवेगळ्या मैदानांवर दसरा मेळावे घेऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यंदा दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
या मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही त्यांच्यासारखे घरात बसून नव्हे तर ठासून दोन वर्षे सरकार चालवलं”.
मुख्यमंत्री म्हणाले, “जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने घासून, बसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, मी आनंद दिघे यांचा चेला आहे,
असा स्वस्तात परत जाणार नाही. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळून जाणारा नाही, तर लोकांना पळवणारा आहे.
कट्टर शिवसैनिक कधीच मैदान सोडत नाहीत. शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत नाहीत. म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे निघालो आहोत”.
शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख एकनाथ शिंदे म्हणाले, “मला सर्व शिवसैनिकांना एक गोष्ट सांगायची आहे, हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात जिथे जिथे जातो तिथे तिथे सर्वजण हसतमुखाने स्वागत करून आशीर्वाद देतात.
मागील दोन वर्षांमध्ये आपण हेच कमावलं आहे. आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे. लाडक्या बहिणींचं, भावांचं आणि शेतकऱ्यांचं लाडकं सरकार झालं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला सांगितलं होतं, अन्याय झाला तर पेटून उठा, सहन करू नका. अन्यायावर लाथ मारा, त्यामुळेच आम्ही उठाव केला.
आम्ही हा उठाव केला नसता तर शिवसेनेचं, शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं. सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता. हा महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता”.
एकनाथ शिंदे म्हणाले, आपलं सरकार सत्तेवर आल्यावर हे राज्य पुन्हा एकदा अनेक बाबतीत पहिल्या नंबरवर आलं. आधीच्या सरकारच्या काळात आपलं राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर होतं, मात्र आपण मेहनतीने ते पहिल्या नंबरवर आणलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठावर दसरा मेळाव्यातून जोरदार हल्ला केला. मुंबई महानगरपालिकेत सत्ता असताना शिवसेना उबाठाने लूट केली.
ते म्हणाले, जिथे टेंडर तिथे सरेंडर. कंत्राटदारांना सूट देताना जनाची नाही तरी मनाची वाटली पाहिजे होती. गेली २५ वर्षे तुमची मुंबईत सत्ता होती.
पण तुम्हाला लोकांशी काही घेणंदेणं नव्हतं. धारावीतील लोक आले आहेत. धारावी हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. पण त्यातही काड्या घालण्याचं काम सुरू आहे.
पहिला कंत्राटदार होता तेव्हा मुख्यमंत्री कोण होतं. त्यांनी कंत्राटदार का रद्द केला सर्वांना माहीत आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा. पण धारावीकरांना खितपत ठेवण्याचं काम केलं आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही माहिती घेतली. आधीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जे पात्र त्यांना घरे द्या. मी म्हटलं जे राहतात त्या सर्वांना घर द्या.
एक घराची किंमत एक कोटी. दोन लाख घराची किंमत दोन लाख कोटी आहे. धारावीकारांनी अफवांना बळी पडू नका. तुमचं हित काय, स्वप्न काय ते पाहा.
आपण उठाव केला नसता तर फक्त फेसबुक लाइव्हच झालं असतं. आपण फेसबुक लाइव्हवाले नाही, आपण फेस टू फेस काम करणारे लोक आहोत.
बाळासाहेब म्हणायचे नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. आपण ते शिकलो. करतो. पण नर्मदेचे गोटे कोरडेच राहिले.
महाराष्ट्राचं चित्र काय असंत. मोरू उठला, अंघोळ केली. अन् मोरू झोपला. आता तोच मोरू गल्लो गल्लीत फिरत आहे. दिल्लीत फिरत आहे.
मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा म्हणून फिरत आहे. अरे बाबा तुमच्या सहकाऱ्यांना तुमचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून चालत नाही, मग राज्यातील जनतेला कसं चालेल.
मी दोन वर्षातील रिपोर्ट कार्ड द्यायला तयार आहे. तुम्ही अडीच वर्षातील दाखवा. हिंमत असेल तर दाखवा. कोविडचं कारण सांगून त्यांना लपवता येणार नाही. लोक मरत होते, तुम्ही पैसे मोजत होता. कुठे फेडाल हे पाप. आम्ही रस्त्यावर होतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.








