‘वीकेण्ड’ मध्ये पावसाचा जोर वाढणार

The intensity of rain will increase during the 'weekend'

 

 

 

ऑगस्ट महिन्याचा अखेरचा वीकेण्ड हा गणेशोत्सवाच्या आधीचा अखेरचा वीकेण्ड असल्याने खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे.

 

मागील काही दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून येत्या वीकेण्डला मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

पुढील दोन आठवड्यांसाठी जारी करण्यात आलेल्या पूर्वानुमानानुसार, कोकण विभागात ७ ते १२ सप्टेंबरच्या आठवड्यामध्येही पावसाची तीव्रता वाढलेली असेल.

 

गणेश आगमनासाठी मुंबईतील बाजारपेठांमध्ये सध्या मोठी लगबग सुरू आहे. मखर, सजावटीपासून ते गौरी-गणपतीच्या दागिन्यांपर्यंत, खाद्यपदार्थांपासून रोषणाईच्या दिव्यांपर्यंत विविध साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.

 

स्थानिक बाजारपेठांसोबतच घाऊक बाजारपेठाही गजबजून गेल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाआधीच्या, म्हणजेच येत्या वीकेण्डला या खरेदीचा उत्साह अधिक असेल.

 

मात्र यामध्ये पावसाची अधूनमधून उपस्थिती असण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मध्यम सरींची शक्यता आहे.

 

ठाणे जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर थोडा वाढून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

 

रायगड जिल्ह्यात सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरात सोमवारी ऑरेंज अलर्ट असून वीकेण्डलाही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर जाणवण्याची शक्यता आहे.

 

गुरुवारी वर्तवण्यात आलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार, २९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत उत्तर मुंबईत तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात पावासाची शक्यता आहे.

 

उत्तर गुजरातवरील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम तसेच नैऋत्य दिशेने प्रवास करत असून याचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात जाणवण्याची शक्यता आहे.

 

या प्रणालीनंतर बंगालच्या उपसागरात आणखी एका प्रणालीची निर्मिती होत असून त्यामुळे ५ सप्टेंबरनंतरच्या आठवड्यात कोकण विभागात पावसाची तीव्रता आणखी वाढू शकते.

 

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार प्रत्यक्ष गणेशोत्सवाच्या काळात कोकण विभागात पाऊस पडू शकतो, असा अंदाज आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *