शंभर रुपयांसाठी पोलिसांची हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण, पोलिसांवर निलंबनाची कारवाई

Police beat up hotel staff for Rs 100, suspension action taken against police

 

 

 

दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना केवळ शंभर रुपये दिले नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चांगलेच अंगलट आले आहे.

 

मुंबई पोलिस दलाच्या शिस्तीस व लौकिकास मोठया प्रमाणात बाधा पोहोचविणारे हे अशोभनीय कृत्य असल्याचा ठपका ठेवत कॉन्स्टेबल सत्यनारायण शिंदे आणि संदीप कोळी यांना निलंबित करण्यात आले आहे. केवळ शंभर रुपयांसाठी दोघांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

काळबादेवी परिसरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पानटपऱ्या, दुकाने तसेच इतर आस्थापनांकडून पैसे जमा करण्याचे काम एका चर्मकाम करणाऱ्याकडे देण्यात आले होते.

 

या व्यक्तीने ७ एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास दोन पानटपऱ्यांकडून प्रत्येकी ५० रुपये आणि तिसऱ्या पानटपरीवाल्याकडून ३० रुपये घेतले. त्यानंतर हे व्यक्ती येथून जवळ असलेल्या हॉटेलमध्ये गेला.

 

हॉटेल कर्मचाऱ्यांकडे त्याने शंभर रुपयांची मागणी केली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे जमा करणाऱ्या व्यक्तीने याबाबतची माहिती दिल्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास कॉन्स्टेबल सत्यनारायण शिंदे आणि संदीप कोळी हे दोघे त्या ठिकाणी पोहोचले.

 

त्यांनी जबरदस्तीने शटर उघडविण्यास लावले आणि आतमध्ये शिरले. दंड भरण्यासाठी पोलिस ठाण्यात चला, असे कर्मचाऱ्यांना सांगितले. यावर त्यांनी दंडाचे कारण विचारले. यामुळे संतापलेल्या शिंदे आणि कोळी यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

 

पोलिसांच्या मारहाणीत जखमी झालेल्या हॉटेल कर्मचाऱ्याने वैद्यकीय तपासणी करीत पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. त्याच्या तक्रारीची नोंद डायरीत नोंद करून घेण्यात आली.

 

 

या घटनेची माहिती कळताच पोलिसांकडून संपूर्ण घटनेची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये सत्यनारायण शिंदे आणि संदीप कोळी या दोघांनी पैशासाठी मारहाण केल्याचे दिसून आले. त्यांचे हे कृत्य ही अतिशय गंभीर बाब असल्याचे नमूद करीत दोघांनाही पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले.

 

निलंबनाच्या काळात त्यांना खासगी नोकरी अथवा खासगी व्यवसाय करू नये तसेच मुंबईची हद्द सोडून जाऊ नये असे बजावण्यात आले आहे. त्याचबरोबर दररोज हजेरी आणि दर शुक्रवारी सकाळी साप्ताहिक कवायतीसाठी नायगांव पोलिस मुख्यालय येथे हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *