12 आमदारांच्या नियुक्तीबाबत काय म्हणाले नूतन राज्यपाल सी पी राधाकृष्णन ?
What did the new governor CP Radhakrishnan say about the appointment of 12 MLAs?

महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भाष्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वीच राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.
“जे गरजेचे असेल ते नक्की केले जाईल”, असं सीपी राधाकृष्णन राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीबाबत म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते.
सी पी राधाकृष्णन म्हणाले, मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आहे. जर शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव कदाचित राधाकृष्णन नसते. मला आपल्या संस्कृती व ऐतिहासिक वारशाचा गर्व आहे.
मी शेतकरी, ओबीसी, एसटी एससी या प्रवर्गाच्या विकासासाठी काम करेल. मी राज्य सरकारसोबत समन्वयाने काम करेल, राज्याच्या विकासासाठी काम करेन.
महाविकास आघाडीचे सरकार असताना भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीवरुन महाविकास आघाडी
आणि कोश्यारी यांच्यामध्ये मोठा वादही झाला होता. भगतसिंह कोश्यारी भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करतात, त्यांनी घटनात्मक पदाचा गैरवापर केलाय,
अशी टीका महाविकास आघाडीचे नेते सातत्याने करत होते. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले मात्र, 12 आमदारांच्या नियुक्त्या शेवटपर्यंत झाल्या नव्हत्या.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्त्या कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानपरिषदेतील 12 आमदार राज्यपालांद्वारे नियुक्त केले जात असतात.
महाविकास आघाडीचे 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. त्यानंतर सरकार बदलले आणि त्यांनी ही यादी परत पाठवली. शिवाय नवीन यादी देण्यासही त्यांनी सुचवले होते.
सीपी राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. लहान वयातच ते भारतीय जनसंघाचे सदस्य झाले होते. यावेळी त्यांचे वय 17.5 वर्ष होते.
सीपी राधाकृष्णन हे देखील दोन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. 1998 आणि 1999 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांनी भाजपच्या तिकिटावर जिंकल्या.
पण 2004, 2012 आणि 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत.