धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग:VIDEO
VIDEO:Massive fire breaks out in running electric bus

पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी दुपारी ‘पीएमपीएमएल’च्या एका धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. निगडीहून महाळुंगे एमआयडीसीकडे कामगारांना घेऊन जाणाऱ्या या विशेष बसमध्ये साधारण ५० प्रवासी प्रवास करत होते.
मेट्रो लाईनचा स्लॅब वाहनांवर कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, Video
महिंद्रा कंपनीसमोरून ही बस जात असताना अचानक बसच्या मागील भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच ज्वाळा उसळू लागल्या. सुदैवाने, बसचालकाने तत्काळ प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला थांबवली आणि वाहकाच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’
शॉर्ट सर्किट किंवा बॅटरी यंत्रणेतील बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले,
मात्र तोपर्यंत ही लाखो रुपयांची बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. काही प्रवाशांना धुरामुळे थोडा त्रास झाला असला तरी, कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या घटनेमुळे चाकण परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
आता रेशनकार्ड धारकांना तांदळाऐवजी गव्हासोबत मिळणार हे धान्य
दरम्यान, या घटनेने सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ‘पीएमपीएमएल’ बसेसना आग लागण्याच्या किमान १० ते १२ घटना समोर आल्या आहेत.
कधी इंजिन गरम होणे तर कधी बॅटरीमधील बिघाड ही कारणे प्रशासनाकडून दिली जातात, परंतु प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या तांत्रिक चुकांना जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रशासनाचा देखभाल-दुरुस्तीचा अभाव की कंत्राटदारांचा निष्काळजीपणा, यावरून संताप व्यक्त केला जात आहे.
एअर इंडिया विमान अपघाताबद्दल धक्कादायक बातमी
एकीकडे शासन ‘ग्रीन मोबिलिटी’चा प्रचार करत असताना, या इलेक्ट्रिक बसेस जर असुरक्षित ठरणार असतील तर प्रवाशांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा गंभीर सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक फेरीनंतर बसच्या इलेक्ट्रिकल वायरिंगची तपासणी होणे गरजेचे आहे.
तसेच बसमध्ये अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असणे, चालकांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण देणे आणि धूर निघताच अलार्म वाजणारी यंत्रणा बसवणे अनिवार्य असायला हवे. प्रशासनाने या घटनांची केवळ कागदोपत्री चौकशी न करता दोषींवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे, अन्यथा प्रवाशांचा हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो.
PMPML Bus Catches Fire In Chakan Industrial Estate; 50 Passengers Escape Unhurt pic.twitter.com/iOtqhVEBOm
— Pune First (@Pune_First) February 13, 2026








